शाह यांच्याकडून 150 जिल्हाधिकाऱ्यांना फोन : रमेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 4 जून रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी 150 जिल्हाधिकाऱ्यांना फोन केल्याचा दावा काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे. रमेश यांच्या या दाव्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना पत्र लिहून याविषयी स्पष्टीकरण मागितले आहे.
आयोगाने रमेश यांना स्वत:च्या दाव्यासंबंधीचा तपशील सादर करण्याचा निर्देश दिला आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी आतापर्यंत 150 जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला आहे असा दावा जयराम रमेश यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केला होता. गृहमंत्र्यांनी या जिल्हाधिकाऱ्यांना एकप्रकारे धमकाविले असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
जनता नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना सत्तेवरून हटवू पाहत आहे. याचमुळे विरोधी पक्षाच्या आघाडीला अधिक जागा मिळणार आहेत. अधिकाऱ्यांनी कुणाच्याही दबावाखाली येऊ नये आणि घटनेचे पालन करावे असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
आयोगाचे पत्र
मतमोजणी करण्याची जबाबदारी रिटर्निंग अधिकाऱ्याची आहे. या जबाबदारीचे योग्यप्रकारे पालन होईल हे पाहणे रिटर्निंग अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे. तर जयराम रमेश यांनी केलेले वक्तव्य लोकांच्या मनात संशय निर्माण करू शकते. याचमुळे सर्वांच्या हितासाठी अशाप्रकारच्या वक्तव्यांकरता जयराम रमेश यांनी स्पष्टीकरण देणे आवश्यक असल्याचे आयोगाने पत्रात नमूद केले आहे.
जिल्हाधिकाऱ्याकडून नाही तक्रार
कुठल्याही जिल्हाधिकाऱ्याकडून आतापर्यंत अशाप्रकारची कुठलीही तक्रार प्राप्त झालेली नाही. कुठल्याही जिल्हाधिकाऱ्याने स्वत:च्या कार्यक्षेत्रात अशाप्रकारच्या कुठल्याही संशयास्पद हालचाली झाल्याची तक्रार नोंदविलेली नाही असे आयोगाने स्पष्ट केले आहे. याचमुळे आयोगाने आता जयराम रमेश यांच्याकडून यासंबंधी डाटा मागविला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रभावित केलेले 150 जिल्हाधिकारी कुठले हे जयराम रमेश यांनी सांगावे असे आयोगाने म्हटले आहे.