प्रतिनिधी / मडगाव
फातोर्डा येथील वृत्तपत्र विक्रेते जयराम गावडे (70) यांचे काल बुधवारी पहाटे 5 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्मयाने निधन झाले. ते भारतीय जनता पक्ष, फातोर्डाचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. काल दुपारी मडगाव हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्च्यात चार पूत्र व एक विवाहीत कन्या असा परिवार आहे.
जयराम गावडे यांच्या निधनावर फातोर्डाचे माजी आमदार तथा प्रदेश भाजपचे सरचिटणीस दामू नाईक यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. जयराम गावडे यांच्या निधनाने भाजपने एक प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ता गमावला असल्याची प्रतिक्रीया दामू नाईक यांनी व्यक्त केली आहे. पक्षाने कोणतीही जबाबदारी दिली तर ती अत्यंत प्रामाणिकपणे ते पार पाडायचे. त्यांच्या कुटूंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे श्री. नाईक यांनी म्हटले आहे.
जयराम गावडे काल बुधवारी पहाटे 5 वा. नेहमी प्रमाणे वृत्तपत्र वितरणासाठी घोगळ जंक्शन येथील आपल्या दुकानावर आले होते व वृत्तपत्राच्या पुरवण्या वृत्तपत्रात घालत असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्याची प्राणज्योत मालवली. ते घोगळ, चौगुले कॉलेज व बोर्डा परिसरात दररोज सकाळी वृत्तपत्रांचे वितरण करायचे. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला.
दुपारी 1.30च्या दरम्यान, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दामू नाईक, फातोर्डा भाजप मंडळाचे अध्यक्ष मनोहर बोरकर, मंडळाचे सरचिटणीस वल्लभदास रायकर व दिलीप नाईक तसेच इतरांची उपस्थिती होती.









