वृत्तसंस्था / पुणे
येथील बालेवाडीच्या क्रीडा संकुलात सुरू असलेल्या 2024 च्या प्रो कबड्डीलीग स्पर्धेतील जयपूर पिंक पँथर्स आणि यू मुम्बा यांच्यातील अटीतटीचा सामना अखेर 22-22 असा टाय झाला.
या सामन्यात यु मुम्बा संघातील सोमवीरने 7 गुण तर रोहीत राघवने 4 गुण मिळविले. जयपूर पिंक पँथर्सतर्फे रेझा मिरभागेरीने 6 गुण, रोनक सिंगने 4 आणि अंकुश राठीने 3 गुण मिळविले. या सामन्याच्या सुरुवातीला यु मुम्बाने आपल्या वेगवान चढाईवर 3 गुणांची आघाडी जयपूर संघावर मिळविली. मात्र त्यानंतर दोन्ही संघांनी बचावात्मक पवित्रा घेतला. जयपूर पिंक पँथर्सच्या निरज नरवाल आणि सुरजित सिंग यांनी चढाया केल्या. पण त्यांना फारसे यश मिळू शकले नाही. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत यु मुम्बाने जयपूर पिंक पॅथर्सवर 12-8 अशी 4 गुणांची आघाडी घेतली होती. सामन्याच्या उत्तराधामध्ये रोनक सिंगच्या शानदार खेळीमुळे जयपूर पिंक पॅथर्सने यु मुम्बाशी बरोबरी साधली. शेवटच्या 10 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघांनी आघाडी वाढविण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी दोन्ही संघांनी 22-22 असे गुण नोंदविल्याने हा सामना बरोबरीत राहिला.









