वृत्तसंस्था/ अहमदाबाद
येथे सुरु असलेल्या सहाव्या अल्टीमेट टेबल टेनिस स्पर्धेत श्रीजा अकुला आणि यशाश मलिकच्या शानदार कामगिरीच्या जोरावर जयपूर पेट्रीऑट्सने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. उपांत्य फेरीच्या लढतीत जयपूर पेट्रीऑट्सने दबंग दिल्लीचा 8-7 असा निसटता पराभव केला. या स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी खेळविला जाणार आहे.
धेंपो गोवा चॅलेंजर्स आणि यु मुंबा यांच्यात उपांत्य फेरीचा दुसरा सामना खेळविला जाणार असून या सामन्यातील विजयी संघाबरोबर जयपूर पेट्रीऑट्सची जेतेपदासाठी अंतिम लढत होईल. जयपूर पेट्रीऑट्स आणि दबंग दिल्ली यांच्यातील उपांत्य फेरीच्या लढतीत यशाश मलिकने दिल्ली दबंगचा कर्णधार आणि भारताचा अनुभवी ज्येष्ठ टेटेपटू जी. साथियानचा 2-1 असा पराभव केला. तसेच जयपूर संघातील श्रीजा अकुलाने या लढतीतील अंतिम सामन्यात दबंग दिल्लीच्या दिया चितळेचा निसटता पराभव केला. या उपांत्य लढतीतील पहिल्या सामन्यात जपूरच्या कणक झाने दिल्लीच्या क्वेकचा 2-1 असा पराभव केला. त्यानंतर मारिया झियाओने जयपूरच्या ब्रिट इयरलँडवर 2-1 अशी मात करत दबंग दिल्लीला बरोबरी साधून दिली. दबंग दिल्लीच्या जी. साथियान आणि झियाओ यांनी जितचंद्र आणि इयरलँड यांचा मिश्र दुहेरीत 2-1 असा पराभव केला. त्यानंतर एकेरीच्या सामन्यात जयपूरच्या मलिकने जी. साथियानचा 2-1 तर शेवटच्या एकेरी सामन्यात श्रीजा अकुलाने दिया चितळेचा 2-1 असा पराभव करत जयपूर पेट्रीऑट्सला अंतिम फेरीत नेले.









