मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची अधिवेशनात घोषणा
चिकोडी : हिरेकोडी (ता. चिकोडी) येथील नंदीपर्वत आश्रमाचे जैनमुनी आचार्य श्री कामकुमारनंदी महाराज यांच्या खून प्रकरणाचा तपास सीआयडीला हस्तांतर करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. बेंगळूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनात बुधवार, 19 रोजी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत ही घोषणा केली. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, जैनमुनी हत्या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. सरकार नागरिकांच्या मागणीनुसार या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देत आहे. जैन मुनी खूनप्रकरणी यापूर्वीच नारायण माळी व हसन ढालायत या दोन आरोपींना अटक केली आहे. चिकोडी डीवायएसपी बसवराज यलिगार यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी सीआयडीकडे तपास हस्तांतर करणार असल्याचे सांगितल्याने पुढील काळात आणखीन चांगला तपास होणार आहे. भाजपच्या मागणीपुढे सरकार नमले आहे. जैन मुनींची निर्घृण हत्या करण्यात आली असून हे कृत्य केवळ दोघांकडून होणे अशक्य आहे. यामागे अनेकांचे हात असून खरे सत्य बाहेर यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा तपास सीबीआयला देण्याची मागणी भाजपचे अनेक नेत्यांनी केला. तसेच याविषयी सभागृहात भाजपने आवाज उठविला होता. कर्नाटक पोलीस सक्षम असताना सीबीआयकडे तपास का? अशी भूमिका राज्य सरकारची होती.









