ग्रासरूट चषक फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : ओरियन बिल्डर्स पुरस्कृत ग्रासरूट चषक 10 वर्षाखालील आंतरक्लब फुटबॉल स्पर्धेत जैन हेरिटेज ब, मॅजिक स्पोर्टींग, जैन हेरिटेज अ, मानस स्पोर्ट्स अकादमी, मॅजिक चॅलेंजर संघानी आपल्या प्रतिस्पर्धांवर मात करून प्रत्येकी 3 गुण मिळविले. सेंट पॉल्स स्कूल मैदानावर आयोजित केलेल्या ग्रासरूट चषक फुटबॉल स्पर्धेच्या 10 वर्षाखालील मुलांच्या गटात खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात जैन हेरिटेज ब संघाने मॅजिक चॅलेंजर संघाचा 1-0 असा पराभव केला. सामन्याच्या 16 व्या मिनिटाला जैनच्या ओमने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सामन्यात मॅजिक स्पोर्टींग संघाने केएलई इंटरनॅशनल संघाचा 6-0 असा पराभव केला. या सामन्यात 7, 13 व 19 व्या मिनिटाला मॅजिक स्पोर्टींगच्या ट्रॅव्हिसोने 3 गोल करून 3-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 24 व्या मिनिटाला चैतन्यने चौथा गोल केला. 28 व 31 व्या मिनिटाला भुवनने 2 गोल करून 6-0 ची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात केएलई संघाला गोल करण्यात अपयश आले. तिसऱ्या सामन्यात मानस स्पोर्ट्स संघाने जैनहेरिटेज ब संघाचा 4-0 असा पराभव केला. 11 व्या मिनिटाला मानसच्या हाफीजने पहिला गोल केला. 17 व्या मिनिटाला हुसेनने दुसरा गोल केला. तर 25 व्या मिनिटाला चैतन्यने तिसरा गोल करून 3-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 29 व्या मिनिटाला हुसेनने चौथा गोल करून 4-0 ची आघाडी मिळवून दिली.
चौथ्या सामन्यात जैन हेरिटेज अ संघाने संजय घोडावत संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात दुसऱ्या सत्रात विराजने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. संजय घोडावत संघाने गोल करण्याच्या संधी दवडल्याने त्याना गोल करण्यात अपयश आले. पाचव्या सामन्यात केएलई इंटरनॅशनल संघाने मॅजिक चॅलेंजर संघाला 2-2 अशा बरोबरीत रोखले. केएलईतर्फे अश्विन व आर्यन यांनी गोल केले. तर मॅजिक चॅलेंजरतर्फे हार्दिनने 2 गोल केले. सहाव्या सामन्यात मानस स्पोर्ट्स संघाने एसजीएस अ संघाचा 12-0 असा पराभव केला. मानस संघातर्फे हुसेनने 4, चैतन्य व अबुजार यांनी प्रत्येकी 2, हाफिजने 3 तर प्रणवने 1 गोल केला. सातव्या सामन्यात जैन हेरिटेज ब ने केएलई इंटरनॅशनलचा 3-1 असा पराभव केला. जैन हेरिटेजतर्फे समर्थ, धिर व ओंम यांनी प्रत्येकी 1 तर केएलईतर्फे अश्विनने 1 गोल केला. आठव्या सामन्यात जैन हेरिटेजला संजय घोडावत अ संघाने गोलशून्य बरोबरीत रोखले. नवव्या सामन्यात जैन हेरिटेज ब ने मॅजिक सुपर किंग्सचा 2-1 असा निसटता पराभव केला. जैनतर्फे आंsमने 2 गोल केले. तर मॅजिकतर्फे डेव्हीडने एक गोल केला. दहाव्या सामन्यात मानस स्पोर्टसने मॅजिक चॅलेंजरचा 4-0 असा पराभव केला. या सामन्यात हुसेनने 2, अबुजर व आर्या यांनी प्रत्येकी 1 गोल केला.









