पोलाइट्स चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : सेंट पॉल्स स्कूलचे माजी विद्यार्थी संघटना पोलाइट्स ऑफ बेळगाव वर्ल्ड वाईड, सेंट पॉल्स स्कूल, डॉ. गुरु मोदगी पुरस्कृत पोलाइट्स चषक 14 वर्षाखालील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन दिवशी जैन हेरिटेजने केएलएसचा तर इंडस अल्टमने भरतेश सेंट्रल संघाचा पराभव करून विजय सलामी दिली. सेंट पॉल्स स्कूलच्या टर्फ फुटबॉल मैदानावरती स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणूर्न नीलम गुड्डीगोळी, पुरस्कर्ते डॉ. गुऊ मोदगी, शितल गुड्डीगोळी, राजू दोड्डण्णवर, प्राचार्य रेव्हरंडन फादर सिमोन फर्नाडिस, उपप्राचार्य फादर अल्ड्रीन डिकोस्टा, डॉ. अनिल पाटील, अंकित कसोटीया, अमित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पाहुण्यांच्या हस्ते दोन्ही संघांच्या खेळाडूंची ओळख करून व चेंडूला किक करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विनायक धामणेकर, परेश मुरकुटे, जस्विंदरसिंग खुराना, तन्वीर आष्टेवाले, तन्वीर मेणशे, विशाल हनिगेरी आधी उपस्थित होते. उद्घाटनाचा सामना जैन हेरिटेज व केएलएस यांच्यात झाला. या सामन्यात जैन हेरिटेजने केएलएसचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात दहाव्या मि. जैन हेरिटेजच्या चैतन्य नाईकने जोरदार चेंडू गोल मुखात मारला होता पण केएलएसचा गोलरक्षक विश्वजीत मैत्रिने उत्कृष्ट अडविला. 17 व्या मिनिटाला केएलएसच्या अनुज हनगोजीने मारलेला फटका गोल पोष्टला लागून बाहेर गेला.
पहिल्या सत्रात दोन्ही संघाना गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे गोल फलक शून्य बरोबरच राहिला. दुसऱ्या सत्रात 28 व्या मिनिटाला केएलएसला फ्री किक मिळाली होती याचा फायदा रितेश सिद्धण्णवरला मिळाला त्यानी मारलेला फटका साई हेड द्वारे मारण्याचा प्रयत्न केला पण चेंडू गोल गोष्ट लागून बाहेर गेला. खेळ संपण्यास एक मिनिट बाकी असताना जैन हेरिटेजला कॉर्नर मिळाला त्या कॉर्नरवर चैतन्य नाईकच्या पास वर बसवराज बोंमनगीने सुरेख गोल करून 1-0 आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सामन्यात इंडस अल्टमने भरतेश सेंट्रल संघाचा 1-0 निसटता पराभव केला.
या सामन्यात सतराव्या मिनिटाला इंडस अल्टमच्या रियांश पाटीलने गोल करण्याची संधी वाया दवडली. विसाव्या मिनिटाला भरतेशच्या अंकितने मारलेला फटका गोल पोष्टला लागून बाहेर गेला. त्यामुळे पहिल्या सत्रात गोल फलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात 38 व्या मिनिटाला उदय सी च्या पासवर रियांश पाटीलने सुरेख गोल करत 1-0 अशी महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भरतेश संघाने गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले पण त्यांना अपयश आले.
गुरुवारचे सामने
- कनक मेमोरियल वि. संजय घोडावत यांच्यात दुपारी 3,30,
- कर्नाटक दैवज्ञ वि. अंगडी इंटरनॅशनल यांच्यात दुपारी 4.30 वा.
- एम व्ही हेरवाडकर वि. शेख सेंट्रल यांच्यात सायंकाळी 5.30









