सत्ताधाऱ्यांनी मराठा समाजाला फक्त झुलवत ठेवले असून ते मराठा समाजाला आरक्षण देण्यास टाळाटाळ करत आहेत. या सरकारने आरक्षणाशी संबंधित बैठक घेण्याचा शब्द दिला होता पण त्यांनी तो पाळला नसून मनोज जरांगे यांना सरकारने दिलेल्या 40 दिवसांच्या मुदतीमध्ये आरक्षण द्या नाहीतर राज्य सरकारला संपुर्ण मराठा समाजाचा रोष पत्करावा लागेल असा इशारा कोल्हापूरात सकल मराठा समाजाकडून झालेल्या ‘जेल भरो’ आंदोलनावेळी देण्यात आला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज कोल्हापुरात सकल मराठा समाज आक्रमक झाला. मिरजकर तिकटीवर सकल मराठा समाजाच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले. सकल मराठा समाजाकडून राज्य़ सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येऊन सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. आंदोलकांनी मिरजकर तिकटीवर ‘एक मराठा….लाख मराठा’ अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
यावेळी बोलताना दिलीप देसाई यांनी मराठा समाजाचे आंदोलन चिरडण्याचे काम सरकार करत असल्याचा म्हटले. ते म्हणाले, “राज्य सरकार मराठा समाजाचे आंदोलन चिरडण्याचे काम करत आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असलेले चंद्रकांत पाटील यांना कोणत्याही प्रकारचे अधिकार देण्यात आले नाहीत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटील यांचा एकतर राजीनामा घ्यावा किंवा त्यांना सर्वाधिकार द्यावेत. मनोज जरांगे यांना दिलेला शब्द सरकारने पाळावा.” असे म्हटले आहे.
या आंदोलनात शिवसेना- ठाकरे गटासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेऴी आरक्षण आमच्या हक्काचं…नाही कुणाच्या बापाचं…, कोण म्हणतय देत नाही….घेतल्याशिवाय राहत नाही…, या सरकारचे करायचं काय…? अशा घोषणा देण्यात आल्या. सकल मराठा समाजाच्यावतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. यामध्ये ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार, दिलीप देसाई, विजय देवणे, बाबा इंदुलकर, आर.के. पवार, बाबा पार्टे यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी सरकार चालढकल करत असल्यामुळे सरकार विरोधात रोष व्यक्त करत कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच गोल रिंगण करून रास्ता रोको केला. त्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेवून सोडून दिलं.









