आशिष आडिवरेकर,कोल्हापूर
राज्यातील कारागृहात बंदीस्त असलेल्या तसेच कारागृह उद्योग व्यवसायात कार्यरत कैद्यांसाठी कारागृह प्रशासनाने पगारवाढीचा निर्णय घेतला आहे. कुशल, अर्धकुशल, अकुशल आणि खुल्या वसाहतीतील बंद्यांना ही पगारवाढ मिळणार आहे. त्याचा फायदा कळंबा मध्यवर्ती कारागृहातील तब्बल 977 बंदीजनांना मिळणार आहे. यामध्ये 36 महिला कैद्यांचाही समावेश आहे.
राज्यातील विविध कारागृहात वेगवेगळ्या गुह्यांतर्गत बंदी कैद्यांच्या सुधारणा व पुनर्वसनासाठी त्यांना वेगवेगळ्या व्यावसायिक कौशल्याचे शिक्षण दिले जाते. यासाठी कारागृहांमध्ये विविध उद्योग सुरु केले आहेत. राज्यातील सर्व 60 कारागृहांमध्ये विविध उद्योगांमध्ये दैनंदिन सरासरी 7 हजार कैदी काम करत आहेत. यापैकी 1 हजार कैदी एकट्या कळंबा कारागृहात कार्यरत आहेत.
कारागृहातून कुटुंबींय, वकिलांना मनीऑर्डर
कैदी कारागृहातील उद्योगांमध्ये काम करून आर्थिक मोबदला कमावतात व त्यातून स्वत:साठी कारागृहातील कँटीनमधून दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करतात. तसेच कुटुंबियांना त्यांच्या अडीअडचणीत पोस्टाद्वारे मनिऑर्डर करतात, काही बंदी आर्थिक मोबदल्यातून वकिलांची फी भरतात. अशा अनेक कामांसाठी बंद्यांना स्वत: खर्च करता येतो, त्यामुळे कैद्यांमध्ये स्वावलंबी असल्याची भावना निर्माण होते. कारागृहात शिक्षा भोगताना कामात गुंतल्याने कैद्यांची मानसिकता सकारात्मक राहते. तसेच शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर पडल्यानंतर कारागृहातील कामाचा त्यांना फायदा होतो. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर याच अनुभवाच्या जोरावर ते स्वत:च्या पायावर उभे राहू शकतात.
अशाप्रकारे मिळणार लाभ
कैद्यांचे प्रकार पूर्वीचे नवीन वेतन कारागृहातील संख्या
1 कुशल कैदी 67 74 329
2 अर्धकुशल कैदी 61 67 223
3 अकुशल कैदी 48 53 365
4 खुलै कैदी 85 94 60
ओपन कारागृहातील बंद्यांना शेतीमध्ये काम
खुल्या कारागृहातील बंदीजनांना शेतीचे काम दिले जाते. खुल्या कारागृहात सराईत, कुख्यात गुंड नसतात. त्यामुळे या बंद्यांना कमी स्वरुपाची शिक्षा असते. त्यांना शिक्षेतून सवलत, रजा मिळावी यासाठी केवळ खुल्या कारागृहात ठेवले जाते. त्यांना म्क्तु संचार करता येण्यासाठी काही वेळ कारागृहातून बाहेर शेतीकामासाठी पाठवले जाते.
कारागृहातील विविध उद्योगांमध्ये सक्तमजुरी बंदी
कारागृहातील विविध उद्योग व्यवसायांत सक्तमजुरी असणारे बंदी काम करत आहेत. त्यांना कारागृहाबाहेर जाण्यास मनाई असते. त्यामुळे त्यांना कारागृहात विविध विभागात काम दिले जाते. काही कैद्यांना कारागृहातील प्रशासकीय कामकाजात सहभागी करुन घेतले जाते. जेवण बनवणे, वाढणे, साफसफाई, दवाखाना, ग्रंथालय येथे त्यांना सेवेत सामावून घेतले जाते.
कारागृहातील व्यवसाय
कळंबा कारागृहामध्ये सध्या फौंड्री, सुतारकाम, लोहारकाम, शेती, बगीचा, लाडू प्रसाद केंद्र, बेकरी, टेक्स्टाईल असे विविध उद्योग सुऊ आहेत. यातून शासनाच्या तिजोरीत महसुलाची भर पडत आहे. उत्पन्नामध्ये राज्यातील कारागृहात कळंबा कारागृहाचा दुसरा क्रमांक आहे. येरवडा कारागृहानंतर सर्वात जास्त उद्योग कळंबा कारागृहात राबवण्यात येतात.
1 हजार बंदीजनांना मिळते काम
कारागृहातील प्रशासकीय काम : 229 बंदी
खुले कारागृह शेतीसाठी : 60
कारागृहातील कारखाना : 373
इतर उद्योग : 315
एकूण : 977
कारागृहातील बंदीजनांच्या वेतनात वाढीचा निर्णय राज्य शासन व कारागृह प्रशासनाने घेतला आहे. याचा लाभ कळंबा कारागृहातील 977 बंदीजनांना होणार आहे. त्यामुळे बंदीजनांमध्ये स्वावलंबनाची भावना वाढणार असून आपल्या पायावर उभे राहण्यास त्यांना मदत होणार आहे.
पांडुरंग भुसारे, कारागृह अधीक्षक, कळंबा