श्रीराम सेनेचे कारागृहासमोर आंदोलन
बेळगाव : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त हिंडलगा येथील कारागृहात प्रतिवर्षाप्रमाणे पूजन करण्यासाठी गेलेल्या युवकांना कारागृह अधिकाऱ्यांनी मज्जाव केला. कारागृहात जाऊन अशा प्रकारे पूजन करता येणार नसल्याचा फतवा काढल्याने या निषेधार्थ श्रीराम सेना, बेळगावच्यावतीने कारागृहाच्या समोरच आंदोलन छेडण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बेळगावच्या हिंडलगा कारागृहात 100 दिवस तुरूंगवास भोगला आहे. त्यामुळे प्रतिवर्षी सावरकरांच्या पुण्यतिथी दिवशी हिंडलगा कारागृहात जाऊन तेथे सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. सोमवारी श्रीराम सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते कारागृहात गेले असता त्यांना कारागृह अधिकाऱ्यांनी मज्जाव केला. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी कारागृहासमोरच आंदोलन करत अधिकारी तसेच सरकारचा निषेध केला. यावेळी श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर, भाजप नेते धनंजय जाधव तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









