वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांची सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या (एसीसी) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
जय शहा यांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव लंका क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शम्मी सिल्व्हा यांनी दुसऱ्यांदा मांडला होता आणि त्याला एसीसीच्या इतर सर्व सदस्यांनी समर्थन दिले. एसीसीची वार्षिक सर्वसाधारण बैठक बाली येथे होत आहे. शहा यांना 2021 मध्ये पहिल्यांदा हे पद मिळाले होते. बांगलादेश क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष नझमुल हसन यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली होती. शहा यांच्या नेतृत्वाखाली एसीसीने 2022 मध्ये आशिया चषक स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये तर 2023 मध्ये वनडे फॉरमॅटमध्ये यशस्वी करून दाखविली. ‘माझ्यावर एसीसी मंडळाने विश्वास दाखविला याबद्दल मी कृतज्ञ आहे. आशिया विभागात ज्या ठिकाणी हा खेळ अजून विकसित होण्याची गरज आहे, तेथे अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आशिया विभागातील विकासासाठी एसीसी कटिबद्ध आहे,’ असे जय शहा म्हणाले. शहा यांच्या मार्गदर्शनाखाली आशियातील क्रिकेटची नक्कीच भरभराट होईल, असा विश्वास ओमानचे पंकज हसन यांनी व्यक्त केला.









