त्या आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे
प्रतिनिधी/ बेळगाव
जय किसान भाजी मार्केटमधील गाळे पाडविण्यात यावेत, अशी मागणी करत महापालिकेचे गेट बंद करून सरकारी कामात अडथळा आणण्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीसाठी सोमवारी जय किसान भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी सकाळपासून सायंकाळपर्यंत ठिय्या आंदोलन केले. सायंकाळी 4.30 वा. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच अधिक चर्चा करण्यासाठी निवडक पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयात यावेत, असे सांगितल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
सोमनाथनगर येथील जय किसान भाजी मार्केटचा लँड यूज बदल आदेश बुडा आयुक्तांनी आपोआप रद्द झाल्याचा आदेश जारी केल्यानंतर गेल्या महिनाभरापासून अनेक घडामोडी घडत आहेत. कृषी पणन खात्याने जय किसान भाजी मार्केटचा व्यापार परवाना रद्द केल्याने या ठिकाणी व्यापार करण्यास जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे एपीएमसी आवारात भाजी मार्केट सुरू झाले आहे.
लँड यूज बदल आदेश रद्द होण्यासह कृषी पणन खात्याने व्यापार परवाना रद्द केला असल्याने महानगरपालिकेनेही बांधकाम परवाना आणि पूर्णत्व प्रमाणपत्र रद्द करण्यासंदर्भात नोटीस जारी करावी, तसेच तेथील गाळे पाडविण्यात यावेत, या मागणीसाठी शनिवारी शेतकरी संघटनेच्यावतीने महापालिकेचे गेट बंद करून ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला आक्षेप घेत सोमवारी जय किसान भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांनी महापालिकेसमोर सकाळपासून सायंकाळपर्यंत ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली.
शेतकऱ्यांना शेतीमालासंदर्भात, तसेच अन्यायाविरोधात आंदोलन करण्याची मुभा आहे. पण भाजी मार्केटमधील गाळे पाडविण्याची मागणी करणे चुकीचे आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. महानगरपालिका आयुक्तांनी तक्रार केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करून घेऊन त्यांना तातडीने अटक करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त नारायण बरमणी यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले. शांततेत आंदोलन करावे, कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. पण हे आंदोलन सायंकाळपर्यंत सुरूच होते. सायं. 4.30 च्या दरम्यान पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
जिल्हाधिकारी या नात्याने मी तुमच्या सोबत आहे. जय किसान भाजी मार्केटच्या बाजूला असलेल्या दोन एकर जागेत किरकोळ भाजीपाला विक्री करण्यासाठी तातडीने जागेचा एनए करून देण्यात येईल. कायद्याच्या चौकटीत बसेल असे कार्य केले जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी मोजक्या पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे यावे, त्या ठिकाणी बसून चर्चा करू, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. तत्पूर्वी जय किसान भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांनी आपल्या वकिलांसोबत चर्चा करून बैठकीला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला.
मनपा आयुक्तांची भेट हुकली
सकाळच्यावेळी मनपा आयुक्त शुभा बी. यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन निवेदनाचा स्वीकार केला. मात्र काहीवेळातच त्या महापालिकेतून निघून गेल्या. भाजी मार्केटचे पदाधिकारी मनपा आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करण्यासाठी त्यांच्या कक्षाकडे गेले असता आयुक्त कामानिमित्त बाहेर गेल्याचे सांगण्यात आले. शनिवारी ज्या शेतकऱ्यांनी महापालिकेसमोर आंदोलन केले, त्यांच्याविरोधात तक्रार देण्याची मागणी उपस्थित मनपा अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. तसेच मनपा आयुक्तांशी नगरसेवक व व्यापारी मुजम्मील डोणी यांनी फोनवरून संपर्क साधला. पण आपण न्यायालयाच्या सुनावणीसाठी धारवाडला गेल्याचे आयुक्तांनी सांगितले.









