शिवजयंती चित्ररथ मिरवणूक वैशिष्ट्यापूर्ण : गोवा, कोल्हापूर, चंदगडसह आसपासच्या गावांमधूनही मिरवणूक पाहण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी
मनीषा सुभेदार/बेळगाव
छत्रपती शिवरायांचा दरारा, त्यांचा दरबार, जात-पात, धर्म अशा भेदापलीकडे जाऊन त्यांनी केलेले मावळ्यांचे संघटन याचे गोडवे आपण आजही गातो आणि त्याचेच प्रत्यंतर बेळगावच्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीमध्ये सुद्धा पाहायला मिळते. चित्ररथ मिरवणूक आणि गणेशोत्सव काळात विसर्जन मिरवणूक या दोन मिरवणुकीमुळे बेळगावच्या सांस्कृतिक परंपरेमध्ये मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यामुळे ही मिरवणूक पाहण्यासाठी केवळ बेळगावच नव्हे तर गोवा, कोल्हापूर, चंदगड अशा आसपासच्या गावांमधूनही शिवप्रेमी येत असतात.
शिवजयंती चित्ररथ मिरवणूक ही वैशिष्ट्यापूर्ण तर आहेच. या मिरवणुकीसाठी चित्ररथ तयार करणाऱ्या प्रत्येक मंडळांचे परिश्रम कौतुकास्पद आणि वाखाणण्याजोगे आहे. आपल्या मंडळाचा देखावा प्रभावी व वैशिष्ट्यापूर्ण ठरावा यासाठी साधारण दोन महिन्यांपासून मंडळांचे प्रयत्न सुरू असतात. आपले काम आणि नोकरी सांभाळून कार्यकर्ते सायंकाळनंतर तालमीसाठी रात्र जागवतात. त्यांच्या प्रयत्नामुळेच चित्ररथ मिरवणूक यशस्वी होते, यामध्ये दुमत नाही.
मिरवणुकीला शिस्त असणे अत्यंत आवश्यक
पण, प्रत्येकवेळी हा पण विचार करायलाच लावतो. चित्ररथ मिरवणुकीला शिस्त असणे अत्यंत आवश्यक आहे. सन्माननीय अपवाद वगळता मंडळांनी आता ही शिस्त कशी आणता येईल याचा विचार करायला हवा. महामंडळ मिरवणूक यशस्वी होण्याच्या दृष्टीने पूर्वबैठका घेते. त्या बैठकांमध्ये मिरवणूक शांततापूर्ण व्हावी, शिस्तबद्ध व्हावी, डीजेला फाटा द्यावा, अशा चर्चा झडतात. पण प्रत्यक्षात मिरवणुकीवेळी दुसरेच चित्र समोर येते. डीजे पूर्णत: बंद कधीच होत नाही. अलीकडे तर चित्ररथांवरील देखावे करणारे मंडळ म्हणजेच देखावे समर्थक आणि डीजे समर्थक असे दोन गट पडलेले पाहायला मिळतात. डीजेच्या दुष्परिणामांची कल्पना डॉक्टरांनी वारंवार देऊनही डीजे समर्थक केवळ स्पर्धा म्हणून जर मिरवणुकीमध्ये डीजे आणत असतील तर त्यांचे समुपदेशन करणे आवश्यक आहे. हॉस्पिटल प्रामुख्याने बालरुग्ण जेथे आहेत असे हॉस्पिटल, वृद्धाश्रम अशा ठिकाणी डीजे लावण्यावर निर्बंध आहेत. परंतु मिरवणुकीमध्ये त्याचे भान सुटते.
मिरवणुकीच्या शिस्तीलाच लागतो सुरुंग
बेळगावमधील बऱ्याच हॉस्पिटलमधील डॉक्टर चित्ररथ मिरवणुकीच्या दरम्यान आपले रुग्ण दुसरीकडे स्थलांतरीत करत आहेत, ही काही अभिमानाची किंवा शोभनीय गोष्ट नाही. डीजेच्या तालावर थिरकणे हा तरुणाईचा उत्साह एक वेळ समजून घेता येईल परंतु त्यामुळे एकूण मिरवणुकीचाच रसभंग होत असेल तर मात्र, विचार करायला हवा. सुदैवाने यंदा चित्ररथ मिरवणुकीचा एक मार्ग असावा व डीजेसाठी एक मार्ग असावा अशी मागणी शांतता समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आली होती. त्यानुसार यंदा त्याची काही अंशी अंमलबजावणीही झाली. परंतु, चित्ररथांच्यामध्येच डीजे घुसवला गेल्यास मिरवणुकीच्या शिस्तीलाच सुरुंग लागतो. आणि हे दरवर्षी होत आहे.
या कारणास्तव मंडळांमध्ये निष्कारण चुरस वाढते आणि ईर्षा सुरू होऊन वादाला तोंड फुटते. एवढीशी ठिणगी पुढे कोणते रुप धारण करेल याचा अंदाज आपण करू शकत नाही. दुर्दैवाने पोलिसांच्यावर निष्कारण ताण येतो. आणि मिरवणूक बघण्यासाठी उत्साहाने दुरवरून आलेल्या शिवप्रेमींचीही निराशा होते. हे सर्व टाळणे शक्य आहे. फक्त त्यासाठी मंडळांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. म्हैसूरचा दसरा हा मिरवणुकीमुळेच जगप्रसिद्ध ठरला आहे. याचे महत्त्वाचे कारण या मिरवणुकीमध्ये पाळली जाणारी शिस्त. सर्व देखावे एकाचवेळी येऊन दाखल होत नाहीत तोपर्यंत मिरवणूक सुरू होत नाही. त्याचवेळी दिलेली वेळ पाळण्याची तत्परता सरकारी टॅबलो दाखवतात. सरकारी पातळीवर होणाऱ्या या मिरवणुकीमध्ये शिस्त पाळली जाते. परंतु बेळगावच्या मिरवणुका या लोकवर्गणीतून आणि लोकसहभागातून होत असल्याने त्याचे महत्त्व आणि कीर्ती दूरवर पोहोचण्यासाठी शिस्त अतिशय महत्त्वाची आहे.
बरोबरी करण्याचा अट्टहास नको
नाव शिवरायांचे आणि ओठी पाकीट गुटख्याचे… आणखी कशाकशाचे? हे तर मुळीच शोभणारे नाही. दुर्दैवाने बरोबरीच्या करण्याच्या अट्टहासामध्ये तरुणीसुद्धा मागे राहिल्या नाहीत ही बरोबरी अपेक्षित नाही. असा उन्माद वेळीच आवरायला हवा. चित्ररथ मिरवणुकीचा उत्साह निरंतर ठेवून तो उन्मादामध्ये बदलणार नाही याची जबाबदारी प्रत्येक मंडळाला घ्यावी लागेल. त्यादृष्टीने चित्ररथ मिरवणुकीच्या पदाधिकाऱ्यांनी व महामंडळाच्या सदस्यांनी आतापासूनच तयारी करणे भाग आहे. जय शिवाजी असे म्हणताना आपल्याला अभिमान वाटायला हवा. मिरवणुकीतील तरुणाईचा हिडीसपणा पाहून मान खाली घालण्याची वेळ यायला नको आहे. यादृष्टीने मंडळे आत्मपरीक्षण करतील अशी अपेक्षा करूया.
अनेक मंडळांकडून उत्तमोत्तम देखावे सादर
यंदाच्या चित्ररथ मिरवणुकीमध्ये अनेक मंडळांनी उत्तमोत्तम देखावे सादर केले. चव्हाट गल्लीने सादर केलेला ‘गड आला पण सिंह गेला, कांगली गल्लीने डीजेवर प्रतिबंध घालण्याचा संदेश दिला. खंजर गल्लीने पावनखिंडची लढाई हा देखावा सादर केला. बापट गल्लीच्या मंडळाने भक्ती शक्तीचा संगम हा देखावा सादर करून लक्ष वेधून घेतले. समर्थनगर मंडळाने ध. संभाजी महाराजांच्या जीवनावरील प्रसंग सादर केला. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गवळी गल्लीने बटेंगे तो कटेंगे हा देखावा सादर केला. महाद्वार रोड येथील मंडळाने शाळा वाचविण्याचा देखावा सादर केला. याशिवाय रामा मेस्त्री अड्डा, ताशिलदार, अनंतशयन गल्ली, भांदूर गल्ली, फुलबाग गल्ली, ज्युनियर शिवाजी पार्क, सह्यादीपुत्र युवक मंडळ, नेहरुनगर, गांधीनगर यासह अनेक मंडळांनी अतिशय उत्तमोत्तम देखावे सादर केले. ही सर्व मंडळे अभिनंदनास पात्र आहेत.









