मनीषा सुभेदार / बेळगाव
‘जय शिवराय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा देत शिवजयंती उत्सव साजरा करणाऱया सर्वांनीच आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. आपण नेमका उत्सव साजरा करतो आहोत की उन्मादाकडे वळतो आहोत, याचा विचार गांभीर्याने व्हायलाच हवा. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव किंवा छत्रपतींवरील निष्ठा व्यक्त करण्यासाठी सुरू झालेला शिवजयंती उत्सव असो; त्यामागचा हेतू आपण पार विसरूनच जात आहोत का?
बेळगावची चित्ररथ मिरवणूक पाहता काही प्रश्न निश्चितपणे पडले आहेत. आपल्या शहरातील चित्ररथ मिरवणूक ही अत्यंत देखणी असते. वैविध्यपूर्ण देखाव्यांमधून प्रत्येक मंडळाच्या कल्पकतेचे येथे दर्शन घडते. बुधवारच्या मिरवणुकीतही ते घडले. दोन वर्षे शिवजयंती उत्सव करण्यावर मर्यादा आल्याने यंदा कोरोनामुक्त वातावरणात उत्सव साजरा करण्याचा मंडळांचा उत्साह अपूर्व, वाखाणण्याजोगा आणि कौतुकास्पद होता.
आपला चित्ररथ वैशिष्टय़पूर्ण ठरावा, यासाठी प्रत्येक मंडळाने अविरत धडपड केली. प्रसंग निवडणे, संहिता व संवाद लेखन करणे, पात्रांची निवड करणे, त्यांची तालीम घेणे हे काही सोपे काम नव्हते. यासाठी लागणारा निधी उभा करणे मंडळांसमोर आव्हान असते. कार्यकर्ते किंवा एखादे प्रायोजक ही जबाबदारी स्वीकारतात. मात्र, इतक्मया परिश्रमांचे चीज होत नाही, याचे नक्कीच वैषम्य आहे.
बुधवारी शहरातून एकूण 73 चित्ररथ निघाले. परंतु, प्रत्यक्षात किती पाहिले गेले, याचे उत्तर निराशाजनक आहे. उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी महामंडळ, कार्यकर्ते, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन बैठका घेते. शिस्तबद्ध मिरवणुकीची चर्चा होऊन तशी ग्वाही दिली जाते. परंतु, ही शिस्त मिरवणुकीदिवशी नेमकी कुठे हरवते?
मिरवणुकीच्या आयोजनामध्ये महामंडळाचा पुढाकार आणि प्रयत्न याबद्दल त्यांना धन्यवाद द्यायला हवेत. तथापि, बैठका आणि चर्चा होऊनसुद्धा प्रत्येक मिरवणुकीमध्ये विलंब का होतो? आणि शिस्तीचे घोडे कोठे अडते? हे तपासायला हवे. यंदा तर दुपारीच मंडळांनी आपले चित्ररथ मारुती गल्लीत आणून ठेवले. तेव्हा यावषी उशीर होणार नाही, अशी आशा निर्माण झाली होती. परंतु, दुर्दैवाने ती फोल ठरली.
अलीकडच्या काळात गॅलरीची सोय नसल्याने रस्त्यावर प्रचंड गर्दी होत आहे. हा अनुभव लक्षात घेऊन गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने दोरी बांधून नागरिकांच्या उभारण्याची सोय करावी, जेणेकरून मधल्या मार्गावरून एकापाठोपाठ चित्ररथ शिस्तबद्धपणे जाऊ शकतील व त्याचा आनंद इतरांना घेता येईल. शिस्तीच्या अभावामुळे अनेक मंडळांच्या उत्कृष्ट अशा देखाव्यांना प्रेक्षक नागरिक मुकले आणि कार्यकर्त्यांचे परिश्रम निष्कारण वाया गेले. हे टाळण्यासाठी महामंडळाने पुढीलवर्षी सहा महिने आधीच नियोजनाला सुरुवात करावी, असे विनम्रपणे सुचवावेसे वाटते.
तरुणाईचा उत्साह अपार आहे आणि तो असायलाच हवा. परंतु, तो उन्मादामध्ये बदलणार नाही, याची काळजी समाजधुरिणांनी घ्यायला हवी. डीजे नको म्हटल्यास तरुणाई संतप्त होते अथवा निराश होते. डीजेचालकांचा व्यवसाय चालण्यासाठी डीजेला सर्वस्वी विरोधही उपयोगाचा नाही. मात्र, ज्या शिवरायांचे नाव आपण घेतो, ज्यांनी सतत सर्वसामान्यांचे हित महत्त्वाचे मानले, त्याचे दाखले आपण शिवचरित्रातून घेत असताना जनतेला उपद्रव देण्याचा अधिकार आपल्या कोणालाच नाही.
हॉस्पिटल, नागरी वसाहत, वृद्धाश्रम, शाळा या ठिकाणी डीजे लावण्यावर निर्बंध आहेत अथवा त्यांच्या आवाजाची पातळी कमी करायला हवी. परंतु, डीजेवर थिरकणाऱया तरुणाईला ना इतरांच्या हिताचे भान आहे ना नियमांची जाण आहे. आम्ही सज्ञान आहोत व आम्हाला स्वातंत्र्य आहे, हे सांगताना स्वातंत्र्यापाठोपाठ जबाबदारी येते, हे आता तरुणाईला ठणकावून सांगायची वेळ आली आहे.
मिरवणुकीमध्ये डीजे लावून तोंडात सिगारेट धरून अपेय पान करून, गुटखा खाऊन नाचणारी तरुणाई शिवरायांचा कोणता आदर्श घेत आहे? शिवराय असोत किंवा कोणतेही राष्ट्रीय संत असोत, त्यांना जाती-धर्माच्या चौकटीत बसविता येणार नाही. शिवराय हे तर प्रत्येक भारतीयाचे दैवत आहे. त्यामुळे आमची मिरवणूक आणि आमचे शिवाजी, असे कोणी म्हणूही नये.
डीजेबद्दल किंवा त्यावर नाचण्याबद्दल विरोध असण्याचे कारण नाही. फक्त त्याबाबत काही भान बाळगायला हवे. तरुणाई आपली क्रयशक्ती अशीच वाया घालवणार आहे का? शिवाजी महाराजांचा अभिमान आणि आदर असणाऱया कोणालाही व्यसनाचा किंवा अर्वाच्य शब्द वापरण्याचा अधिकार नाही. किंबहुना जिथे चुकते ते ठणकावून सांगण्याचा राजांचा आदर्श आपल्याला घ्यायला हवा. मिरवणूक एक दिवसाची पण त्याचे पडसाद अनेक वर्षांचे असे व्हायला नको आहे.
कारण, आज हजारो तरुण बेकार आहेत, त्यांचे लग्नाचे वय वाढते आहे. त्यांना मुली देण्यास कोणीही तयार नाही. जी पिढी उत्साहाने सळसळायला हवी, समाजकार्यासाठी धडपडायला हवी, ती अशी पोखरली गेल्यास एक पिढीच्या पिढी बरबाद होते आणि परिणामी समाजही कमकुवत होतो. हे टाळण्याची जबाबदारी महामंडळाची, प्रशासनाची, पोलिसांची आणि माध्यमांचीसुद्धा आहे.
मिरवणूक विधायकतेकडे वाटचाल करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा
चित्ररथ मिरवणूक ही समाजप्रबोधनासाठी आहे. पण तसे होताना दिसत नाही. चित्ररथ मंडळांनी हा उत्सव, ही मिरवणूक विधायकतेकडे वाटचाल करेल, यासाठी पुढाकार घ्यायला हवा. चित्ररथ किंवा देखाव्यांसाठी लाखो रुपये खर्च होतात, ते असे वाया जाऊ नयेत. मंडळांना विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करता येते किंवा अनेक उपक्रम राबविता येतात. किमान ही मिरवणूक शिस्तबद्ध होईल व त्यातील बेशिस्त आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पुढाकार घेता येईल.
- रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का नको म्हणणारे राजे : छत्रपती शिवराय
- कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची सन्मानाने पाठवणी करणारे राजे : छत्रपती शिवराय
- अन्याय-अत्याचार करणाऱयांचे हात कलम करा म्हणणारे राजे : छत्रपती शिवराय
- शौर्य व धैर्य यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे : छत्रपती शिवराय
- स्वराज्य व तुळजाभवानी यांच्याबरोबरच जिजाऊंना दैवत मानणारे राजे : छत्रपती शिवराय
- सर्वसामान्य जनतेला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेणारे राजे : छत्रपती शिवराय
- उत्तम प्रशासक, कुशल संघटक असा लौकिक असणारे राजे : छत्रपती शिवराय