सॉफ्ट लँडिंगनंतर काय होणार?
भारताच्या चांद्रयान-3 ने बुधवारी संध्याकाळी चंद्राच्या दक्षिण ध्रूवावरसॉफ्ट लँडिंग करण्यास यश मिळविले आहे. चांद्रमोहीम यशस्वी ठरल्यावर देशभरात जल्लोषाचे वातावरण असून जग विस्फारलेल्या नजरेने भारताकडे पाहत आहे. परंतु चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर लँडिंग करणेच पुरेसे नसून इस्रोच्या वैज्ञानिकांसाठी खरे कार्य यानाच्या टचडाउननंतर सुरू झाले आहे.
चांद्रयान- 3 च्या चंद्रावरील टचडाउननंतर वैज्ञानिक लूनर डे म्हणजेच चंद्राच्या एका दिवसा (पृथ्वीवरील 14 दिवस)साठी रोव्हरला संचालित करण्यात व्यग्र असणार आहेत. यानंतर इस्रोचे वैज्ञानिक लँडर अन् रोव्हरवरील 5 उपकरणांद्वारे प्राप्त डाटाचे विश्लेषण करतील. इस्रोच्या वैज्ञानिकांसाठी खरे काम टचडाउननंतर सुरू होणार आहे.
लँडर 1 सेंटीमीटर प्रतिसेकंदाच्या वेगाने पृष्ठभागावर चालणार
चांद्रयान-3 च्या टचडाउननंतर त्वरित विक्रम लँडरचा एक साइड पॅनेल खुला होईल, त्यातून रोव्हरसाठी एक रॅम्प तयार होणार आहे. राष्ट्रीय ध्वज अन् चाकांवर इस्रोच्या लोगोसोबत 6 चाकांचा रोव्हर 4 तासांनी लँडरमधून बाहेर पडत चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. लँडर 1 सेंटीमीटर प्रतिसेकंदाच्या वेगाने चालत चंद्राच्या भूमीला स्कॅन करण्यासाठी नेव्हिगेशन कॅमेऱ्यांचा वापर करणार आहे.
चंद्राच्या पृष्ठभागावर भारताचे चिन्ह
लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरू लागताच तेथे तिरंगा अन् इस्रोच्या लोगोचा ठसा उमटविणार आहे. अशाप्रकारे चंद्राच्या पृष्ठभागावर भारताच्या खुणा उमटणार आहेत. रोव्हरमध्ये चंद्राच्या पृष्ठभागाशी संबंधित डाटा प्रदान करण्यासाठी पेलोडसोबत कॉन्फिगर करण्यात आलेली उपकरणे आहेत. ही उपकरणे चंद्राच्या वायुमंडळातील मूलभूत संरचनेशी संबंधित डाटा एकत्रित करत लँडरला पाठविणार आहेत. तीन पेलोडसोबत लँडर नजीकच्या पृष्ठभागावरील प्लाझाचे घनत्व मोजणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागाच्या तापीय गुणधर्मांचे मापन करण्यासह लँडिंग स्थळाच्या आसपास भूकंप होतात का यासंबंधी डाटा जमविणार आहे.
रोव्हर अन् लँडरचा संचार
सौरऊर्जेद्वारे संचालित लँडर आणि रोव्हरकडे चंद्राच्या वायुमंडळाचे अध्ययन करण्यासाठी सुमारे 2 आठवड्यांचा कालावधी असणार आहे. रोव्हर केवळ लँडरसोबत संचार करू शकतो, जे थेट इस्रोच्या नियंत्रण कक्षातून संचालित होणार आहे. चांद्रयान-2 ऑर्बिटरचा वापर आकस्मिक संचार रिलेच्या स्वरुपात देखील केला जाऊ शकतो, असे इस्रोकडून म्हटले गेले आहे.
रात्रीच्या वेळी प्रतिकूल तापमान
रोव्हर अन् लँडरसमोर चंद्रावरील अत्यंत थंड हवामानाचे आव्हान असणार आहे. दक्षिण ध्रूवावर चंद्रावर रात्रीच्या वेळी शून्य ते उणे 238 अंश सेल्सिअस इतके तापमान असते. लँडर आणि रोव्हर दोन्ही आणखी एक चंद्र दिनापर्यंत सक्रीय राहू शकतील अशी शक्यता इस्रोने व्यक्त केली आहे.
दक्षिण ध्रूवाची निवड का?

चंद्राची ध्रूवीय क्षेत्रं ही परस्परांपेक्षा अत्यंत वेगळी आहेत. येथे अनेक असे हिस्से आहेत, जेथे सूर्यप्रकाश कधीच पोहोचत नाही. तसेच तापमान उणे 200 अंश सेल्सिअसपेक्षा खालावते. अशा स्थितीत तेथे बर्फाच्या स्वरुपात पाणी असू शकते, असा वैज्ञानिकांचा अनुमान आहे. भारताच्या 2008 मधील चांद्रमोहीम-1 ने चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याच्या अस्तित्वाचे संकेत दिले होते. चांद्रमोहीम-3 ची लँडिंग साइट चांद्रयान-2 सारखीच आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रूवानजीक लँडिंग करण्यात आले असले तरीही यावेळी याचे क्षेत्र वाढविण्यात आले आहे. चांद्रयान-2 मध्ये लँडिंग साइट 500 मीटर गुणिले 500 मीटरचे होते. परंतु यावेळी लँडिंग साइट 4 किलोमीटर गुणिले 2.5 किलोमीटरचे आहे. चांद्रयान-3 द्वारे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील पहिला देश ठरला आहे. चंद्रावर यापूर्वी उतरलेली सर्व अंतराळयाने भूमध्यरेखीय क्षेत्रात उतरली होती.
भारताच्या हाती लागणार मोठा खजिना

चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगमुळे भारत आता अंतराळ क्षेत्रातील महत्त्वाची शक्ती ठरला आहे. ही मोहीम यशस्वी ठरल्याने भारताच्या हाती मोठा खजिना लागणार असल्याचे मानले जात आहे. हा खजिना भारताला 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्यास सहाय्यभूत ठरू शकतो. 2040 पर्यंत मून इकॉनॉमीद्वारे 4200 कोटींची कमाई होण्याचा अनुमान आहे. 2040 पर्यंत सुमारे 1 हजार अंतराळवीर चंद्रावर पोहोचणार असल्याचा अनुमान आहे. हे पाहता अनेक अंतराळ कंपन्यांना यात व्यवसायाची मोठी संधी दिसून येत आहे. चंद्रापर्यंत पोहोचण्याचा बिझनेस 42 अब्ज डॉलसपर्यंत पोहोचू शकतो. डाटाचा विचार केल्यास भारत याच्या माध्यमातून कोट्यावधी डॉलर्सचे उत्पन्न मिळवू शकतो. चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत पहिला देश ठरला आहे. हे सर्वात मोठे यश तसेच संधी ठरणार आहे. चंद्राच्या पाण्याचे अस्तित्व आढळून आल्यास त्याच्या मदतीने ऑक्सिजन तयार करता येणार आहे. यानंतर चंद्रावर स्थानक निर्माण केले जाऊ शकते. यामुळे चंद्रावर जाणाऱ्या लोकांची संख्या वाढणार आहे. भारत मून टूरिझमचा सर्वात मोठा ऑपरेटर ठरू शकतो.
विक्रम-प्रज्ञानच्या जोडीची अग्निपरीक्षा

भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम यशस्वी ठरल्याने संपूर्ण देशवासीयांसाठी हा क्षण अभिमानाचा अन् गौरवाचा ठरला आहे. यानाच्या विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लड करण्यास यश मिळविले आहे. या कामगिरीसह भारत चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश ठरला आहे. चांद्रयान-3 मोहिमेतील लँडर ‘विक्रम’ आणि रोव्हर ‘प्रज्ञान’ हे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताच त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याची सुरुवात झाली आहे. पृथ्वीच्या एकमात्र नैसर्गिक उपग्रहावर पोहोचल्यावर विक्रम अन् प्रज्ञानला अनेक महत्त्वपूर्ण कार्ये पार पाडावी लागणार आहे. लँडरमध्ये एका निर्धारित चंद्रस्थळाला स्पर्श करण्याची आणि रोव्हरला तैनात करण्याची क्षमता आहे. हा रोव्हर स्वत:च्या गतिशीलतेदरम्यान चंद्राच्या पृष्ठभागाचे इन-सीटू रासायनिक विश्लेषण करणार आहे.
महत्त्वाची भूमिका
लँडर आणि रोव्हरमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर प्रयोग करण्यासाठी वैज्ञानिक पेलोड आहेत. प्रोपल्शन मॉड्यूल (पीएम)चे मुख्य कार्य लँडर मॉड्यूलला (एलएम) लाँच व्हेईकल इंजेक्शनद्वारे चंद्राच्या 100 किलोमीटर गोलाकृती ध्रूवीय कक्षेपर्यंत नेणे आणि एलएमला पीएमपासून विभक्त करणे होते. लँडरने स्वत:सोबत रोव्हरला घेऊन चंद्राच्या पृष्ठभागावर लँड केले. लँडरमधील पेलोडच्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागाचे अध्ययन केले जाणार असून यात नासाचा पेलोड देखील सामील आहे. रोव्हर काही अंतर गाठून चंद्राच्या पृष्ठभागाचे अध्ययन करणार आहे. रोव्हर प्रज्ञानमध्ये पाठविण्यात आलेल्या तीन पेलोडपैकी पहिला पेलोड चंद्राच्या दक्षिण ध्रूवावरील मातीचे अध्ययन करणार आहे. दुसरा पेलोड रासायनिक पदार्थ अणि खनिजांचे अध्ययन करणार आहे. तसेच त्यांचे स्वरुप किती बदलले हे पाहिले जाणार आहे. तिसरा पेलोड चंद्रावर जीवसृष्टीची कितपत शक्यता आहे आणि पृथ्वीशी कुठली समानता आहे की नाही हे पाहणार आहे. ही मोहीम चंद्रावरील एका दिवसापुरती असणार आहे. हा कालावधी पृथ्वीवरील 14 दिवसांइतका असतो.
लँडर
? विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरचे आयुर्मान पृथ्वीवरील 14 दिवसांइतके
? रोव्हरसमवेत याचे आकारमान 1749.86 किलोग्रॅम इतके आहे.
? लँडरमध्ये 4 वैज्ञानिक पेलोडचा अंतर्भाव
? रेडिओ अॅनाटॉमी ऑफ मून बाउंड हायपरसेंसिटिव्ह आयनोस्फीयर अँड
अॅटमॉस्फियर निकटच्या पृष्ठभागाच्या प्लाझ्माचे घनत्व अन् कालौघातील परिवर्तन नोंदविणार आहे.
? सरफेस थर्मो फिजिकल एक्सपेरिमेंट ध्रूवीय क्षेत्रानजीक चंद्राच्या पृष्ठभागाच्या तापीय गुणधर्मांचे मापन करणार आहे.
रोव्हर

? एलआयबीएस चंद्राच्या पृष्ठभागाची माहिती मिळवून देण्यासाठी रासायनिक संरचना प्राप्त करणार आहे.
? अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर चंद्रावरील लँडिंग स्थळानजीक माती अन् दगडांमध्ये मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम,
सिलिकॉन, पोटॅशियम,कॅल्शियम, टायटेनियमचा शोध घेणार आहे.
इस्रोचे कमांड सेंटर

चांद्रयान-3 वर नजर ठेवण्याचे कार्य
चांद्रयान-3 ला चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर लँडिंग कशाप्रकारे करावे, कुठल्या ठिकाणाची निवड करावी, किती वेगात लँड करावे याच्या कमांड्स कोण देते? विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर योग्यप्रकारे कार्य करतेय की नाही हे कोण सांगते असे प्रश्न उपस्थित होणे साहजिकच आहे. प्रत्यक्षात या सर्व कार्यांमागे दोन मोठी सेंटर्स आहेत. पहिले कमांड सेंटर श्रीहरिकोटा येथे सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये आहे. या कमांड सेंटरमधून रॉकेट प्रक्षेपित झाल्यापासून उपग्रहाच्या कक्षेपर्यंत पोहोचविण्याची कमांड पाहिली जाते. याला मिशन कंट्रोल सेंटर म्हटले जाते. कुठलेही यान अंतराळात प्रवास करू लागल्यावर इस्रोचे बेंगळूर येथील सेंटर काम करू लागते. इस्ट्रॅक म्हणजेच इस्रो टेलिमेंट्री, टॅकिंग अँड कमांड नेटवर्कमध्ये यानाच्या पुढील मार्गक्रमणाची दिशा निर्धारित केली जाते. हे सेंटर जगभरातील सेंटर्स, युरोपीय अंतराळ संस्था आणि अनेक अन्य देशांच्या रडार सिस्टीमद्वारे स्वत:च्या उपग्रहांवर आणि अंतराळयानांवर नजर ठेवते. इस्ट्रॅकमध्ये मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्स तयार करण्यात आले असून ते विविध उपग्रह आणि अंतराळयानांच्या स्थितीवर नजर ठेवून असतात. प्रत्यक्षात हे नासाच्या ह्यूस्टनमधील सेंटरसारखे आहे. सेंटरचे मुख्य कार्य प्रक्षेपित कुठल्याही उपग्रहाची स्थिती, नियंत्रण, ट्रॅकिंग, कमांडिंग, डाटा रिसिव्ह करणे, नेटवर्क कॉर्डिनेशन करणे, टेलिमेट्री डाटा मिळविणे आहे. रॉकेटच्या प्रक्षेपणापासून उपग्रह ऑर्बिटमध्ये पोहोचेपर्यंत किंवा त्यापुढील प्रवासात त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावते.
भारतातील इस्ट्रॅकची सेंटर्स
? हैदराबाद
? बेंगळूर
? लखनौ
? पोर्ट ब्लेयर
? श्रीहरिकोटा
? तिरुअनंतपुरम
देशाबाहेरील इस्ट्रॅकची ग्राउंड स्टेशन्स
? पोर्ट लुईस, मॉरिशस
? बीयर लेक्स, रशिया
? बियाक, इंडोनेशिया
? ब्रुनेई
? स्वालबार्ड, नॉर्वे
? ट्रोल, अंटार्क्टिटका
? व्हिएतनाम
? गातून लेक, पनामा
? साओ टोमे अँड प्रिंसिपी, पश्चिम आफ्रिका
देशभरात प्रार्थनांचा ओघ
ऋषिकेशमध्ये पूजा तर लखनौमध्ये नमाज पठण

चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग व्हावे म्हणून विविध देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी प्रार्थना केली आहे. विविध धर्मांचे असूनही लोक या चांद्रमोहिमेच्या निमित्ताने एकत्र आले आणि त्यांनी स्वत:च्या पद्धतींनुसार चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी प्रार्थना केल्याचे चित्र दिसून आले. ही प्रार्थना चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी असली तरीही यातून देशाच्या एकजुटतेचे उदाहरण दिसून आले आहे. चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे साकार होण्यासाठी तीर्थक्षेत्र ऋषिकेश येथील परमार्थ निकेतन घाटावर हातात तिरंगा घेऊन गंगा आरती करण्यात आली. या आरतीपूर्वी तेथे होम करण्यात आला. तर उत्तरप्रदेशची राजधानी लखनौमध्ये देखील चांद्रमोहीम यशस्वी ठरावी म्हणून इस्लामिक सेंटर ऑफ इंडियामध्ये मुस्लीम धर्मीयांनी नमाज अदा केली आहे.
महाकालेश्वर मंदिरात विशेष भस्म आरती
मध्यप्रदेशच्या उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी विशेष भस्म आरती करण्यात आली. याचबरोबर अमेरिकेच्या व्हर्जिनिया येथील एका मंदिरात चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी होम करण्यात आला. अमेरिकेच्या न्यू जर्सी येथील मोनरोमध्ये ओम श्री साई बालाजी मंदिर आणि सांस्कृतिक केंद्रात देखील चांद्रमोहीम यशस्वी ठरावी म्हणून प्रार्थना करण्यात आली होती.
अमेरिकेतही पूजा अन् प्रार्थना
चांद्रयान-3 च्या यशासाठी यज्ञ केला आहे. आम्ही लक्ष्मीनरसिंह स्वामी यांची प्रार्थना करत असून महागणपति होम देखील केला आहे. लक्ष्मीनरसिंह स्वामी यांच्या आशीर्वादाने ही मोहीम यशस्वी ठरणार असल्याचे उद्गार तेथील शर्मा यांनी काढले आहेत. तर प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांच्या टीमने चांद्रयान-3 ला शुभेच्छा देण्यासाठी विशेष वाळूशिल्प तयार केले होते.
चांद्रयान-3 मोहिमेचे शिल्पकार
चांद्रयान-3 यशस्वीपणे चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर उतरले आहे. या मोहिमेच्या यशामागे अनेक इंजिनियर्स आणि वैज्ञानिकांची अथक मेहनत आहे. इस्रोमध्ये कार्यरत या खऱ्याखुऱ्या नायकांबद्दल फारच कमी लोकांना माहिती असावी. चांद्रयान-3 मोहिमेला मूर्त रुप देणाऱ्या या नायकांनी भारतीयांना अभिमानास्पद वाटावी अशी कामगिरी केली आहे. इस्रोचे वैज्ञानिक मागील 4 वर्षांपासून चांद्रयान-3 वर काम करत होते. देशात कोरोना महामारी फैलावली असताना देखील इस्रोची टीम भारताच्या चांद्रमोहिमेच्या तयारीत व्यग्र होते. सुमारे 700 कोटी रुपयांची ही मोहीम पूर्ण करण्यासाठी सुमारे 1 हजार इंजिनियर्स आणि वैज्ञानिकांनी योगदान दिल्याचे इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले आहे.
या लोकांचे महत्त्वाचे योगदान
चांद्रमोहीम-3 मध्ये महिला वैज्ञानिक आणि इंजिनियर्सनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग करविण्यापर्यंतच्या मोहिमेत एस. सोमनाथ यांच्यासोबत प्रकल्प संचालक पी. वीरमुथुवेल, मोहीम संचालक मोहना कुमार, विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक एस. उन्नीकृष्णन नायक, यू.आर. राव सॅटेलाइट सेंटरचे संचालक एम. शंकरन आणि लाँच ऑथराइजेशन बोर्ड प्रमुख ए. राजराजन यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे.
इस्रो प्रमुख एस. सोमनाथ

व्हेईकल मार्क-3 च्या मदतीनेच चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत पोहोचले होते. एअरोस्पेस इंजिनियर एस. सोमनाथ यांनीच चांद्रयानाचे व्हेईकल मार्क-3 किंवा बाहुबली रॉकेटच्या डिझाइनमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. सोमनाथ हे इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स, बेंगळूरचे विद्यार्थी राहिले असून संस्कृत भाषेवर त्यांची चांगली पकड आहे. यानम नावाच्या एका संस्कृत चित्रपटात त्यांनी अभिनय देखील केला आहे.
चांद्रमोहीम प्रकल्प संचालक वीरमुथुवेल

चांद्रयान-3 मोहीम प्रकल्पाचे संचालक वीरमुथुवेल यांनी चेन्नईमधून मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीचे शिक्षण पूर्ण केले आहे. ते चांद्रयान-2 तसेच मंगळयान मोहिमेत देखील सामील होते. वीरमुथुवेल यांनी चांद्रयान-3 मोहिमेच्या आखणीत मोठे योगदान दिले आहे.
मोहीम संचालक मोहन कुमार
एस. मोहन कुमार हे चांद्रयान-3 मोहिमेचे संचालक आहेत. विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे ते वरिष्ठ वैज्ञानिक आहेत. चांद्रयान-3 पूर्वी ते एलव्हीएम-एम3 मिशनवर वन वेब इंडिया 2 सॅटेलाइटचे संचालक होते.
व्हीएसएससी संचालक एस. उन्नीकृष्णन

विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात (व्हीएसएससी) एस. उन्नीकृष्णन नायर आणि त्यांची टीम चांद्रयान-3 च्या प्रत्येक महत्त्वपूर्ण पैलूवर नजर ठेवून आहे. नायर यांनीच जियोसिंक्रोनस सॅटेलाइट लाँच व्हेईकल मार्क-3 विकसित केला आहे. नायक हे एअरोस्पेस इंजिनियर आहेत. इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्समधून त्यांनी स्वत:चे शिक्षण पूर्ण केले आहे.
यूआर राव सॅटेलाइट सेंटरचे संचालक एम. शंकरन
एम. शंकरन यांना इस्रोचे पॉवरहाउस मानले जाते. ते नोवल पॉवर सिस्टीम आणि पॉवर सॅटेलाइटपर्यंत जाणारे सोलर आरेस निर्माण करण्यात कुशल आहेत. उपग्रह निर्मितीमध्ये त्यांना तीन दशकांपेक्षा अधिक कालावधीचा अनुभव आहे. एम. शंकरन यांनी चांद्रयान-1, मंगळयान आणि चांद्रयान-2 मोहिमेतही भाग घेतला होता.
लाँच ऑथरायजेशन बोर्डाचे प्रमुख राजराजन
ए. राजराजन हे एक प्रतिष्ठित वैज्ञानिक असून सध्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राचे संचालक आहेत. चांद्रयान-3 ला कक्षेत स्थापित करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली होती. राजराजन हे कंपोझिटच्या क्षेत्रातील तज्ञ आहेत.
यूआर राव सेंटरच्या प्रकल्प उपसंचालिका के. कल्पना
कोरोना महामारीतील अवघड काळात कल्पना यांनी चांद्रयान-3 टीमसोबत काम केले होते. एक इंजिनियर म्हणून त्यांनी स्वत:चे जीवन भारतासाठी उपग्रह निर्माण करण्यासाठी समर्पित केले आहे. चांद्रयान-2 आणि मंगळयान दोन्ही मोहिमांमध्ये त्यांचा सहभाग होता.
रितु करिधल श्रीवास्तव

डॉ. रितु करिधल श्रीवास्तव इस्रोमधील वरिष्ठ वैज्ञानिक आहेत आणि भारताच्या मार्स ऑर्बिटर मिशन उपसंचालिका राहिल्या आहेत. बेंगळूरमध्ये इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्समधून त्यांनी एमटेकचे शिक्षण घेतले आहे.
अमेरिकेचा डाव, रशियाकडून फसवणूक..

चांद्रयान-3 ला सर्वात अवजड प्रक्षेपक जीएसएलव्ही मार्क-3 द्वारे प्रक्षेपित करण्यात आले आहे. या रॉकेटमध्ये क्रायोजेनिक इंजिनचा अंतर्भाव असून कधीकाळी याच्या तंत्रज्ञान हस्तांतरणात जो बिडेन यांनीच अडथळे आणले होते. 1991 मध्ये भारताने रशियासोबत एक करार केला होता, ज्याच्या अंतर्गत भारताला क्रायोजेनिक इंजिनचे तंत्रज्ञान मिळणार होते. अमेरिकेकडून या कराराला विरोध करण्यात आला. हा करार मिसाइल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजाइमचे उल्लंघन असल्याचे अमेरिकेने म्हटले होते. याचबरोबर अमेरिकेने इस्रोसोबत ग्लॅवकोस्मोसवर निर्बंध लादले होते. रशियाच्या नेत्यांना किंचित बुद्धी सुचेल आणि ते स्वत:ची आर्थिक मदत गमाविण्याचा धोका ओळखून भारतासोबतचा करार टाळतील असा मला विश्वास असल्याचे बिडेन यांनी त्यावेळी म्हटले होते.









