पत्रकार परिषदेत दिली माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामच्यावतीने आणि जय भारत फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 26 फेब्रुवारी रोजी हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगाव परिसरातील एक मोठी मॅरेथॉन म्हणून रोटरी हाफ मॅरेथॉन ओळखली जाते. यावर्षी ‘अवयव दान जनजागृती’ हा विषय घेऊन समाजात जागृती केली जाणार असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावचे अध्यक्ष उमेश रामगुरवाडी यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम 2008 पासून हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करते. यावर्षीच्या स्पर्धेची ही बारावी आवृत्ती आहे. जय भारत फौंडेशनचे अध्यक्ष जयंत हुंबरवाडी यांनी या हाफ मॅरेथॉन स्पर्धेसाठी पुरस्कार प्रायोजित केले आहेत. या स्पर्धेमध्ये अवयव दानाविषयी जागृती केली जाणार आहे. जय भारत फौंडेशन आणि रेस यांच्यावतीने सामाजिक कार्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर अवयव दानाविषयी जागृती करणाऱ्या मोहन फौंडेशनच्यावतीनेही स्पर्धकांमध्ये जागृती केली जाणार आहे. बीपीसीएलने या स्पर्धेसाठी प्रायोजकत्व स्वीकारले आहे.
स्पर्धेसाठी देशभरातून 2 ते 3 हजार धावपटू सहभागी होण्याची अपेक्षा आहे. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण 3.5 लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत. हाफ मॅरेथॉन 21 कि. मी., 10 कि. मी., 5 कि.मी. व 3 कि.मी. अशा प्रकारांमध्ये होणार आहे. मुंबई येथील आरएफआयडी टायमिंग चीपद्वारे सर्व धावपटूंना ई-टायमिंग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या पत्रकार परिषदेवेळी आयर्न लेडी मयुरा शिवलकर, रोहन हरगुडे, संतोष शानभाग व हलगेकर यांच्या हस्ते टी-शर्ट्सचे अनावरण करण्यात आले. पत्रकार परिषदेवेळी महेश अनगोळकर, अश्विन हुबळी, जगदीश शिंदे, पंकज, शीतल मुंदडा उपस्थित होत्या.









