काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी रणदीप सूरजेवाला यांची माहिती
बेळगाव : बेळगावमध्ये 1924 मध्ये झालेल्या काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला यंदा शतक पूर्ण होत आहे. त्यानिमित्त 21 जानेवारी रोजी बेळगावमध्ये ‘जय बापू, जय भीम व जय संविधान’ रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. बेळगावचे व काँग्रेसचे जवळचे नाते आहे. या रॅलीनिमित्त काँग्रेस नेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सहभागी होणार आहेत, अशी माहिती काँग्रेस पक्षाचे कर्नाटक प्रभारी रणदीप सूरजेवाला यांनी दिली. शुक्रवारी बेळगाव दौऱ्यावर आल्यावेळी त्यांनी रॅलीच्या आयोजनाबाबत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली. भाजप सातत्याने संविधानावर हल्ले करत आहे. एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला जात आहे तर दुसरीकडे गरीब, आदिवासी, दलित, महिला यांच्या अधिकारांवर गदा आणली जात आहे.
प्रत्येकाच्या हक्कावर बुलडोझर चालविला जात असताना महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे अनुकरण करणे व विचारसरणी पुन्हा रुजविणे ही काळाची गरज आहे, असेही सूरजेवाला म्हणाले. या रॅलीनिमित्त बेळगावमधून जो आवाज उठेल तो राजकारणाची दिशा आणि दशा यामध्ये परिवर्तन घडवून आणेल. 100 वर्षांपूर्वी जेव्हा महात्मा गांधी काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष झाले, तेव्हा ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी नारा देऊन स्वातंत्र्य मिळविले. आज देशातील भेदभाव, जातपात, गरीब, दलित, शोषित यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध व संविधानावर होणाऱ्या हल्ल्याच्या विरोधात एक नवीन क्रांतीचे सूत्र आम्ही अवलंबणार आहोत, असेही ते म्हणाले. बेळगावनंतर 27 जानेवारी रोजी मध्यप्रदेशच्या महू येथे रॅली काढली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.









