बेंगळूरमध्ये प्रचाराला अभूतपूर्व पाठिंबा : फुलांचा वर्षाव
प्रतिनिधी/ बेंगळूर
विधानसभा निवडणुकीसाठी चार दिवस शिल्लक असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार हाती घेतला आहे. प्रामुख्याने भाजपतर्फे प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे राज्य दौऱ्यावर आहेत. शनिवारी बेंगळूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो लक्षवेधी ठरला. ‘जय श्रीराम’, ‘बजरंग बली की जय’, ‘जय मोदी’ असा जयघोष रोड शो मार्गावर दिसून आला. मोदींचे आगमन होताच त्यांच्यावर पृष्पवृष्टी करण्यात आली. रोड शोला मिळालेला प्रतिसाद हा अभूतपूर्व होता.
शनिवार आणि रविवार असे दोन्ही दिवस एकूण 34 कि. मी. रोड शोचे आयोजन भाजपने केले आहे. शनिवारी 26 कि. मी. रोड शो झाला. 28 विधानसभा मतदारसंघ असलेल्या बेंगळूरमध्ये अधिकाधिक जागा मिळविण्यासाठी भाजपने यावेळी दिग्गज नेत्यांमार्फत प्रचारावर भर दिला आहे. शुक्रवारी रात्रीच बेंगळूरमध्ये आलेल्या पंतप्रधान मोदींचे वास्तव्य राजभवनमध्ये होते. सकाळी त्यांनी जे. सी. नगर येथून सुरू केलेला रोड शो मल्लेश्वरम येथील सँकी टँकी रोड येथे समाप्त झाला.
काँग्रेसने जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याचा मुद्दा मांडल्यामुळे भाजपने काँग्रेसवर याच मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. याचे प्रतिबिंब मोदींच्या रोड शोवेळीही उमटले. मोदींचे प्रचारवाहन जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी हनुमानाच्या भव्य मूर्ती उभ्या करण्यात आल्या होत्या. या मूर्तीही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या. मूर्ती दिसताच मोदी हात जोडून नमस्कार करीत असल्याचे दिसून आले.
मोदींच्या प्रचारवाहनासमोर विविध कलापथकांकडून नृत्य सादर केले जात होते. मोदींना पाहण्यासाठी तासन् तास प्रतीक्षा केलेल्या नागरिकांची झुंबड उडू नये यासाठी पोलीस यंत्रणेने सुरक्षेत कोणतीही कसर सोडली नाही. बेंगळूरच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधानांनी इतका मोठा शो केला आहे.
बेंगळूरमधील मोदींच्या रोड शोमागे भाजपचे राजकीय गणित
बेंगळुरात रविवारी देखील पंतप्रधान मोदींचा रोड शो होणार आहे. मोदींनी बेंगळूरमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यामागे राजकीय गणित आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र, बहुमत मिळाले नाही. बेंगळूर जिल्ह्यातील 28 जागांपैकी 11 जागाच भाजपला मिळाल्या होत्या. काँग्रेसने 15 जागांवर विजय मिळविला होता. त्यामुळे बेंगळूरमध्ये सर्वाधिक जागा मिळविण्यासाठी भाजपने मोदींच्या रोड शोवर भर दिला आहे.









