ऑनलाईन टीम/तरुण भारत
१६ एप्रिल रोजी दिल्लीतील जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीनिमित्त शोभा यात्रा काढल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाच्या दिल्ली युनिटमधील दोन जणांविरुद्ध FIR नोंदवला आहे. शोभा यात्रेनंतर जहांगीरपुरीमध्ये पोलिसांनी दंगल आणि बेकायदेशीरपणे सभा केल्याच्या आरोपाखाली २० हून अधिक लोकांना अटक केली आहे, यामध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.
जहांगीरपूरीच्या सी ब्लॉकमध्ये झालेल्या हल्ल्यात ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची चौकशी चालू असून या शोभायात्रासाठी परवानगी घेण्यात आली नसल्याचं समोर आल्यानंतर विश्व हिंदू परिषदेचा प्रेम शर्मा या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं. पूर्ण चौकशीनंतर दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे असं पोलिसांनी सांगितलं.
विश्व हिंदू परिषदेचा जिल्हा सेवा प्रमुख प्रेम शर्मा आणि बृहम प्रकाश यांनी या शोभायात्रेसंदर्भात कल्पना दिली होती पण त्यांनी अधिकृतरित्या परवानगी घेतली नाही. परवानगी नसताना १६ एप्रिल रोजी लोकं एकत्र जमले आणि त्यांनी घोषणा देणं सुरु केलं. त्यानंतर तिथे दोन गटांत तणाव निर्माण झाला होता. दरम्यान प्रेम शर्मा आणि बृहम प्रकाश यांनी परवानगी नसताना लोकांना गोळा केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करत IPC सेक्शन 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे असं दिल्ली पोलिस उपायुक्त उषा रंगनानी यांनी सांगितले.