वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जूनअखेरच्या तिमाहीत जग्वार लँड रोव्हर इंडिया यांच्या कार विक्रीमध्ये दुप्पट वाढ झाल्याचे दिसून आले आहे. एप्रिल ते जून 2023 या अवधीत कंपनीने 1048 लक्झरी कार वाहनांची विक्री करण्यात यश मिळवलं आहे.
लक्झरी कार निर्माती कंपनीने म्हटले आहे, की मागच्या वर्षी समान अवधीच्या तुलनेमध्ये यावर्षी 102 टक्के कार विक्रीमध्ये वाढ दिसली आहे. कंपनीचे हे कार विक्रीतले प्रदर्शन नक्कीच कौतुकास्पद आहे. रेंज रोव्हर, रेंज रोव्हर स्पोर्ट्स व डिफेंडर या कार्सच्या विक्रीमध्ये 209 टक्के इतकी लक्षणीय वाढ नोंदली गेली आहे. सदरच्या तीनही मॉडेलना ग्राहकांची पसंती लाभली असून आगामी काळात खरेदीसाठी 78 टक्के याच गाड्यांना बुकिंग प्राप्त झाले आहे.

जीएलआर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजन अंबा यांनी सांगितले की आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीने कार विक्रीमध्ये शानदार प्रदर्शन केले आहे, आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेमध्ये कार विक्री दुप्पट नोंदली गेली असून कंपनीसाठी ही बाब स्पृहणीय ठरली आहे. वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्येदेखील कार विक्री मजबूत राहिली आहे.
मर्सिडीझसह इतर कंपन्यांच्या किती खपल्या कार्स
दुसरीकडे स्पर्धक कंपनी मर्सिडीझ बेंझ इंडियाच्या कार विक्रीमध्ये देखील चांगली प्रगती दिसून आली आहे. या अवधीमध्ये मर्सिडीझने 8528 वाहनांची विक्री केली आहे. मागच्या वर्षी जून अखेरच्या तिमाहीमध्ये 7 हजार 573 वाहनांची विक्री करण्यामध्ये कंपनीला यश आले होते. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी या अवधीमध्ये मर्सिडीझने कार विक्रीमध्ये 13 टक्के वाढ दर्शवली आहे. याचप्रमाणे पहिल्या सहा महिन्यांचा विचार करता बीएमडब्ल्यू इंडियाने कार विक्रीमध्ये पाच टक्क्यांची वाढ दर्शवली आहे. या अवधीत 5867 वाहनांची विक्री करण्यात आली आहे. दुसरीकडे जर्मन ऑटो कंपनी ऑडी इंडियाने जानेवारी ते जून या महिन्यांमध्ये 3474 वाहनांची विक्री केली आहे. वर्षाच्या आधारावर 97 टक्के वृद्धी विक्रीत दिसली आहे.









