वृत्तसंस्था/ जामनगर
गुजरातमधील जामनगर येथे बुधवारी भारतीय हवाई दलाचे जॅग्वार लढाऊ विमान कोसळले. या दुर्घटनेत एका पायलटने विमानातून सुरक्षितपणे उडी मारून आपला जीव वाचवला, तर दुसऱ्या पायलटचा रात्री उशिरापर्यंत शोध लागलेला नव्हता. विमान प्रशिक्षण मोहिमेवर असताना ते कोसळले. गंभीर जखमी झालेल्या एका पायलटला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.
जामनगर शहरापासून सुमारे 12 किमी अंतरावर असलेल्या सुवाडा गावात एका मोकळ्या मैदानात विमान कोसळले. अपघातानंतर विमानाला आग लागली, असे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रेमसुख देलू यांनी सांगितले. अपघाताचे कारण त्वरित कळू शकले नाही. अपघाताच्या कारणांची चौकशी करण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन विभाग कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचत बेपत्ता पायलटचा शोध सुरू केला. भारतीय हवाई दलाच्या इतिहासातील ही दुसरी मोठी दुर्घटना आहे. यापूर्वी 7 मार्च रोजी हरियाणातील अंबाला येथे एक जग्वार विमानही कोसळले होते. त्या घटनेतही वैमानिकाने विमानातून उडी मारून आपला जीव वाचवला होता.









