कोल्हापूर / धीरज बरगे :
जिल्ह्यात गूळ उत्पादनात यंदाच्या हंगामातही घट झाली आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये मार्च 2025 अखेर 20.98 लाख गुळ रव्यांची आवक झाली आहे. तर गतहंगामात 22.15 लाख गूळ रव्यांची आवक झाली होती. आकडेवारीनुसार यंदाच्या हंगामात 1.17 लाख गूळ रव्यांनी आवक घटली आहे. जिल्ह्यातील गुळ हंगाम संपला असला तरी कर्नाटकमधून गूळ आणून काही गुऱ्हाळ घरे सुरु आहेत.
कोल्हापूरची ओळख जागतिक पातळीवर पोहोचविणाऱ्या जिल्ह्यातील गूळ व्यवसायाला गेल्या काही वर्षांपासून घरघर लागली आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत गुळाला मिळणारा कमी दर, अपुरे मनुष्यबळ, कुशल कामगारांची कमतरता अशी अनेक आव्हाने गूळ व्यवसायासमोर उभी आहेत. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत जिल्ह्यातील गुऱ्हाळ घरांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. अनेक गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी व्यवसाय तोट्याचा व मानसिक त्रास देणारा ठरत असल्याने त्यांनी हा व्यवसाय बंद करत दुसरा पर्याय निवडला आहे. याचा परिणाम जिल्ह्यातील गूळ उत्पादनावर झाला असून प्रतिवर्षी गूळ उत्पादनामध्ये घट होत आहे.
- हंगामात 3600 ते 4200 रुपयांपर्यंत दर
गेल्या दहा वर्षात उसाचा दर वाढला. कामगारांची हजेरी, उत्पादन साहित्य यांचेही दर वाढले. मात्र गुळाचा दर प्रतवारीनुसार तीन ते चार हजार रुपये प्रति क्विंटल असा सारखाच राहिला आहे. यंदाच्या हंगामातही सरासरी दर 3600 ते 4200 रुपयांपर्यंतच राहिला. हंगामात 1 किलो गूळ रव्यांना उच्चांकी 5600 रुपये दर मिळाला आहे.
- साखरेपासून गूळ निर्मिती सुरुच
जिल्ह्यात साखरेपासून गुळाची निर्मिती सुरु असल्याचे अनेकवेळा निदर्शनास आले आहे. मात्र साखरेपासून होणारे गुळ उत्पादन रोखण्यात बाजार समितीसह, प्रशासन अपयशी ठरले आहे. सध्या जिल्ह्यातील ऊस हंगाम संपला असला तरी बाजार समितीमध्ये गूळ आवक सुरु आहे. जिल्ह्यात अजूनही साखरेपासून गूळ निर्मिती सुरु असल्याचे काही गुळ उत्पादक शेतकऱ्यांमधून सांगितले जात आहे. साखरेचे दर वाढल्यामुळे साखरे पासूनही गुळ बनविण्याचे प्रमाण कमी आले आहे.
- सोमवारपासून दिवसा आड सौदे
जिल्ह्यात गुऱ्हाळ घरांची संख्या कमी झाल्याने याचा परिणाम बाजार समितीमधील गुळ सौद्यांवर झाला आहे. पूर्वी समितीमधील सहा ते सात लाईनमध्ये गुळाचे सौदे निघत होते. तर गुळ उत्पादकांना सौद्यामध्ये सहभागी होण्यासाठी एक आठवडा अगोदर नोंदणी करावी लागत होती. मात्र आता हे चित्र पूर्णपणे बदलून गेले आहे. यंदाच्या हंगामात एकाच लाईनमध्ये सौदे निघायचे. तर नोंदणी न करताही सौद्यांमध्ये गुळ उत्पादक शेतकऱ्यांना सहभागी होता आले. सध्या तुरळक प्रमाणात गुळ आवक सुरु असल्याने सोमवारपासून समितीमध्ये एक दिवस आड गुळाचे सौदे निघणार आहेत.
- शासनाच्या पाठबळाची गरज
गूळ व्यवसायासाठी बँकांकडून कर्ज मिळत नाही. त्यामुळे व्यावसायिकांना स्वत:च विविध पातळीवर आर्थिक तरतूद करावी लागते. यामधून उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपेक्षित दर मिळत नसल्याने व्यवसाय तोट्याचा ठरत आहे. त्यामुळे जिल्ह्यात 1100 असणारी गुऱ्हाळ घरांची संख्या सध्या दोनशेवर आली आहे. कोल्हापुरची ही ओळख टिकवून ठेवण्यासाठी गूळ व्यवसायाला शासनाने आर्थिकसह विविध पातळीवर पाठबळ देण्याची गरज गूळ उत्पादकांमधून व्यक्त होत आहे.
- ऊसाची कमतरता, साखरेचा दर वाढल्याचा परिणाम
ऊसाची कमतरता आणि साखरेचे वाढलेले दर याचा परिणाम जिल्ह्यातील गूळ उत्पादनावर झाला आहे. साखरेचा दर 40 रुपये प्रतिकिलोपर्यंत असल्याने जे उत्पादक साखरे पासून गूळ बनवत होते त्यांना आता साखरेपासूनही गूळ तयार करणे महागात पडत आहे. त्यामुळे गुळाच्या उत्पादना घट झाली आहे. पुढील काळात बाजार पेठेत गुळाची मोठया प्रमाणात कमतरता भासण्याची शक्याता आहे.
– विजय जाधव, अध्यक्ष जिल्हा गुळ उत्पादक शेतकरी संघटना.
- गेल्या पाच वर्षात बाजार समितीमध्ये गूळ रव्यांची झालेली आवक
वर्ष गूळ रव्यांची संख्या
2020-21 23.14 लाख
2021-22 22.94 लाख
2022-23 22.60 लाख
2023-24 22.15 लाख
2024-25 20.98 लाख








