प्रतिनिधी/ बेळगाव
आगामी लोकसभा निवडणूक जवळ येत असून राजकीय पक्षांच्या हालचाली तीव्र होताना दिसत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हुबळीमध्ये माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना तिकीटाची ऑफर दिली आहे. जगदीश शेट्टर यांच्या वाढदिवसानिमित्त शेट्टर यांच्या निवासस्थानी पोहोचलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी धारवाड लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याबाबत शेट्टर यांचे मत जाणून घेत असून तेही इच्छुक असल्याचे मानले आहे, असे सांगितले. दरम्यान, हसत हसत शेट्टर यांनी लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचे सांगितले आहे.
पुढे बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, जगदीश शेट्टर यांच्या निवासस्थानी भेट दिल्याचा विशेष अर्थ काढण्याची गरज नाही. मी यापूर्वी शेट्टर यांच्या निवासस्थानी जाऊन आलो आहे. ते भाजपमध्ये असतानाही मी गेलो होतो. मी सध्या धारवाड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो. शेट्टर यांनी नाश्ता करायला येण्याची विनंती केली होती. दरम्यान, मला समजले की आज शेट्टर यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांच्या घरी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, असे त्यांनी सांगितले.









