किरण जाधव यांनी घेतली महिला मंडळांची बैठक
बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या प्रचारासाठी येथील नेते व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. ‘अब की बार चारसौ पार’चा संकल्प पूर्ण करण्यासाठी स्थानिक नेत्यांकडून घरोघरी प्रचार केला जात आहे. जगदीश शेट्टर यांना अधिकाधिक मते मिळवून देण्यासाठी जोरदार प्रचार सुरू असल्याची माहिती भाजपचे नेते किरण जाधव यांनी दिली. भोई गल्ली, भडकल गल्ली, खडक गल्ली आदी परिसरात महिला मंडळांच्या बैठका घेऊन शेट्टर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. या देशाचा पाया महिला आहेत. देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपतिपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलेला संधी दिली. सर्वसामान्य महिलांसाठी बचत गट, उज्ज्वला योजना, कृषी गट तयार केले. यामुळे महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत होत आहे. जगदीश शेट्टर हे सर्वसामान्य व्यक्तिमत्त्व असून सर्वांमध्ये मिळून मिसळून काम करण्याची त्यांची पद्धत आहे. त्यांनी राज्याचा कारभार चालविला असून त्यांना बेळगावच्या विकासासाठी लोकसभेत पाठविण्याचे आवाहन किरण जाधव यांनी केले. यावेळी एंजल फाऊंडेशनच्या अध्यक्षा मीना बेनके, सरोज आळवणी, राहुल जाधव, राजन जाधव यासह गल्लीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.









