2026 पर्यंत या पदावर राहणार : कार्यकाळ 26 ऑक्टोबर रोजी संपणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने एचडीएफसी बँकेचे एमडी आणि सीईओ म्हणून शशिधर जगदीशन यांची पुनर्नियुक्ती मंजूर केली आहे. शशिधर यांचा कार्यकाळ 26 ऑक्टोबर 2023 रोजी संपत आहे, जो आणखी 3 वर्षांसाठी 26 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढवण्यात आला असल्याची माहिती आहे.
आरबीआयने 18 सप्टेंबर रोजी शशिधर जगदीशन यांची पुनर्नियुक्ती मंजूर केली आहे. 26 ऑक्टोबर 2020 रोजी शशिधर जगदीशन यांनी आदित्य पुरीच्या जागी कंपनीचे एमडी आणि सीईओ म्हणून पदभार स्वीकारला.
अलीकडेच,आरबीआयने आयसीआयसीआय बँकेचे एमडी आणि सीईओ संदीप बक्षी यांच्या पुनर्नियुक्तीलाही मान्यता दिली. जगदीशन 1996 मध्ये एचडीएफसीमध्ये रुजू झाले.
व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट जगदीशन यांनी भौतिकशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ शेफिल्ड, यूके येथून इकॉनॉमिक्स इन मनी, बँकिंग आणि फायनान्समध्ये पदव्युत्तर पदवी देखील घेतली आहे. जगदीशन यांना बँकिंग क्षेत्रातील 31 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. 1996 मध्ये ते एचडीएफसीमध्ये रुजू झाले. 1999 मध्ये त्यांना बिझनेस हेड बनवण्यात आले आणि 2008 मध्ये त्यांना कंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. बँकेचे मार्केट कॅप 1995 मध्ये 440 कोटी रुपये होते, जे 2023 मध्ये वाढून 12.34 लाख कोटी रुपये झाले आहे.









