725 पैकी 528 मते प्राप्त ः मार्गारेट अल्वांना 182 मते, 15 रद्द
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार जगदीप धनखड हे देशाचे 14 वे उपराष्ट्रपती झाले आहेत. त्यांना 528 मते मिळाली असून विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना 182 मते मिळाली. एकूण मतदान केलेल्या 725 मतदारांपैकी 15 मते बाद ठरली आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील मतविभागणी पाहता धनखड यांचा विजय निश्चित मानला जात होता.
उपराष्ट्रपती पदासाठीची निवडणूक शनिवारी पार पडली. सकाळी 10 वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळी पाच वाजता संपले. सध्या संसदेच्या दोन्ही सभागृहांसह 780 सदस्य (राज्यसभेत 8 जागा रिक्त) आहेत. परंतु केवळ 725 (92.94 टक्के) सदस्यांनी मतदान केले. या अर्थाने, बहुमताचा आकडा 363 इतका निश्चित झाला होता. आकडेवारीनुसार, एनडीएचे उमेदवार धनखड यांच्या विजयासाठी भाजपची मते पुरेशी होती. दोन्ही सभागृहात भाजपचे 394 खासदार असून ते 363 या बहुमताच्या आकडय़ापेक्षा जास्त आहे. मात्र, विरोधी गटातील काही पक्षांनी धनखड यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांची मते मोठय़ा प्रमाणात वाढली.
11 ऑगस्टला शपथ घेणार
विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची मुदत 10 ऑगस्ट रोजी संपत असून आता नवनिर्वाचित उपराष्ट्रपती जगदीप धनखड गुरुवार, 11 ऑगस्ट रोजी शपथ घेतील.
तृणमूलच्या खासदारांचे क्रॉस व्होटिंग
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आपल्या 36 खासदारांना मतदानापासून दूर राहण्यास सांगितले होते. परंतु टीएमसीचे खासदार शिशिर अधिकारी आणि दिव्येंदू अधिकारी यांनी ममतांच्या निर्णयाच्या विरोधात मतदान केले. तर समाजवादी पार्टी आणि शिवसेनेच्या दोन, तर बसपाच्या एका खासदाराने मतदान केले नाही. तसेच भाजप खासदार सनी देओल आणि संजय धोत्रे यांनीही मतदान केले नाही.
93 टक्के मतदान
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जवळपास 93 टक्के मतदान झाले. सध्या लोकसभेत 543 खासदार आहेत, तर राज्यसभेच्या 245 पैकी 8 जागा रिक्त आहेत. म्हणजेच इलेक्टोरल कॉलेज 788 ऐवजी 780 खासदारांचे आहे. तथापि, 725 खासदारांनी मतदानात भाग घेतला. त्यानुसार बहुमताचा आकडा 363 झाला होता. एनडीएच्या 441 खासदारांव्यतिरिक्त बीजेडी, वायएसआरसी, बसपा, टीडीपी, अकाली दल आणि शिंदे गटाचाही पाठिंबा मिळाला. 50 हून अधिक खासदारांनी मतदानाचा हक्क बजावला नाही.
अभिनंदनाचा वर्षाव
दरम्यान, निवडणूक आयोगाने धनखड यांचा विजय झाल्याचे जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अन्य नेतेमंडळींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदींनी शनिवारी रात्रीच धनखड यांची प्रत्यक्ष भेट घेत मिठाई आणि पुष्पगुच्छ प्रदान केला.
मार्गारेट अल्वांचा ममतांवर निशाणा
विरोधी पक्षाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांनीही विजयाबद्दल धनखड यांचे अभिनंदन केले. तसेच ट्विट करून अनेक विरोधी पक्षांवर निशाणा साधला. त्यांनी टीएमसीचे नाव न घेता ट्विट करत निशाणा साधला. दुर्दैवाने, काही विरोधी पक्षांनी एकत्रित विरोधी पक्षाच्या कल्पनेला पायरीवरून उतरवण्याच्या प्रयत्नात भाजपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिल्याचे ट्विट त्यांनी केले. ही निवडणूक संपली असली तरी संविधानाचे रक्षण करण्यासाठी, लोकशाही बळकट करण्यासाठी आणि संसदेची प्रति÷ा बहाल करण्याचा लढा सुरूच राहील, असेही त्या पुढे म्हणाल्या.









