सहा ठिकाणी चोरी केल्याची कबुली
बेळगाव : बार, वाईन शॉपमध्ये चोरी करणाऱ्या एका त्रिकुटाला घटप्रभा पोलिसांनी अटक केली आहे. बारमधील रोकड पळविण्याबरोबरच दारूच्या बाटल्या चोरून त्यांची विक्री करण्यात येत होती. घटप्रभाचे पोलीस निरीक्षक एच. डी. मुल्ला व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली असून या त्रिकुटाने सहा बार व वाईन शॉपमध्ये चोरी केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. मल्लाप्पा हंमिन्नावर (वय 20), आप्पय्या हणमण्णावर (वय 24), शानूर गिड्डाप्पगोळ (वय 20) तिघेही राहणार जागनूर, ता. चिकोडी अशी त्यांची नावे आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. या त्रिकुटाने घटप्रभा, हुक्केरी, संकेश्वर व रायबाग पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात चोऱ्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
घटप्रभा पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 2, संकेश्वर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 2, रायबाग पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 2 अशा एकूण सहा बार व वाईन शॉपमध्ये चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. हुक्केरी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात एक दुचाकीचे शोरुम फोडल्याचेही आरोपींनी कबूल केले आहे. त्यांच्याजवळून मोटारसायकल, दीड तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. बार व वाईन शॉप फोडून गल्ल्यातील रोकड पळविण्याबरोबरच दारूच्या बाटल्याही चोरण्यात येत होत्या. पोलीस निरीक्षक एच. डी. मुल्ला, उपनिरीक्षक एच. के. नरळे, एस. आर. कणवी व आर. आर. गिडाप्पगोळ, के. आर. बबलेश्वर, आर. के. होळकर, बी. एम. तळवार, आर. के. धुमाळे, बी. एस. नाईक, एल. एम. पुजारी, एल. एल. चिकोडी व सहकाऱ्यांनी त्रिकुटाच्या मुसक्या आवळल्या आहेत.









