मुख्यमंत्री बसवराज बोम्माई : जगन्नाथराव जोशी जन्मशताब्दी स्मारक भवनाचा भूमिपूजन कार्यक्रम
प्रतिनिधी / बेळगाव
जगन्नाथराव जोशी हे टिळकांसारखे संघटक आणि वाजपेयींसारखे अजातशस्त्रt होते. सर्वांशी सलोख्याने वागणारे जगन्नाथराव जोशी हे उत्तर कर्नाटकातील आदर्श व्यक्तिमत्त्व होते. याबरोबरच त्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात देखील उत्तम कार्य राहिले असून ते खरे देशभक्त होते, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी काढले.
मुख्यमंत्री जनकल्याण ट्रस्ट बेळगावतर्फे आयोजित जगन्नाथराव जोशी जन्मशताब्दी स्मारकाच्या (भवन) भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. गुड्सशेड रोड, शास्त्राrनगर येथील जनकल्याण ट्रस्टच्या आवारात हा कार्यक्रम झाला.
व्यासपीठावर अन्न व नागरी पुरवठामंत्री उमेश कत्ती, पालकमंत्री गोविंद कार्जोळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते मंगेश भेंडे, मंत्री सी. सी. पाटील, ट्रस्टचे विश्वस्त अरविंदराव देशपांडे आदी उपस्थित होते. प्रारंभी स्वागतगीत झाले. प्रास्ताविक व स्वागत अरविंदराव देशपांडे यांनी केले. मुख्यमंत्र्यांसह इतर मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ व ग्रंथ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन फलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच भारतमाता आणि जगन्नाथराव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.
मुख्यमंत्री बोम्माई पुढे म्हणाले, गोवा राज्य देशाचा अविभाज्य घटक आहे. गोवा मुक्ती आंदोलनात स्वातंत्र्यसैनिकांचे कार्य मोठे आहे. जगन्नाथराव यांचे विचार आणि भाषणे प्रभावित करणारी होती. त्यामुळे त्यांनी जनमानसात लोकप्रियता मिळविली. भाजपबरोबरच सार्वजनिक ठिकाणीदेखील त्यांचे कार्य अद्भूत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जगन्नाथराव जोशी स्मारकाच्या (भवन) इमारतीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते मंगेश भेंडे यांनीही यावेळी जनन्नाथराव जोशी यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, खासदार मंगला अंगडी यांसह जनकल्याण ट्रस्टचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.









