संसद भवनात संस्कृतीशी संबंधित हे दुसरे प्रतीक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगन्नाथपुरी यात्रेतील रथाची तीन चाके लवकरच नवीन संसद भवनात बसवण्यात येणार आहेत. संसदेत संस्कृतीशी संबंधित हे दुसरे प्रतीक असणार आहे. श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने शनिवारी यासंबंधी अधिकृत माहिती दिली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नुकतीच पुरीला भेट दिली होती. याप्रसंगी मंदिर समितीने त्यांना दिलेला प्रस्ताव स्वीकारण्यात आला असून त्यासंबंधीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
संसदेमध्ये लावण्यात येणारी ही तीन चाके भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि बलभद्र यांच्या रथांमधून काढली जातील. भगवान जगन्नाथाच्या रथाला नंदीघोष, देवी सुभद्राच्या रथाला दर्पदलन आणि भगवान बलभद्रच्या रथाला तलध्वज असे म्हणतात. या तीन रथांपैकी प्रत्येकी एक चाक दिल्लीला पाठवण्यात येईल. ओडिशाच्या संस्कृती आणि वारशाचे कायमचे प्रतीक म्हणून ते संसदेत बसवले जाणार असल्याचे मंदिर समितीने सांगितले. यावर्षी 27 जून रोजी रथयात्रा काढण्यात आली. रथयात्रेनंतर दरवर्षी तीन रथ वेगळे केले जातात. नंदीघोष रथाचे मुख्य सुतार विजय महापात्रा यांच्या मते, रथांच्या निर्मितीमध्ये दरवर्षी नवीन लाकडाचा वापर केला जातो. काही प्रमुख भाग वगळता रथाचे विघटित भाग एका गोदामात ठेवले जातात. तर त्यातील काही भाग, चाकांसह लिलाव केले जातात. दरवर्षी 200 हून अधिक लोक केवळ 58 दिवसांत 45 फूट उंच तीन रथ बनवतात. हे रथ पाच प्रकारच्या विशेष लाकडाचा वापर करून पूर्णपणे हाताने बनवले जातात. लाकूड मोजण्यासाठी कोणत्याही तराजूचा वापर केला जात नाही, तर 45 फूट उंच आणि 200 टनांपेक्षा जास्त वजनाचे रथ काठीने मोजून बनवले जातात. या रथांना सांस्कृतिकदृष्ट्या प्रचंड महत्त्व आहे.
2023 मध्ये सेंगोलची स्थापना
संसदेत रथयात्रेची चाके बसवल्यानंतर परिसरात संस्कृतीशी संबंधित हे दुसरे प्रतीक असेल. दोन वर्षांपूर्वी लोकसभेत सेंगोलची स्थापना करण्यात आली होती. मे 2023 मध्ये पंतप्रधान मोदींनी संसदेत सभापतींच्या खुर्चीजवळ सेंगोलची स्थापना केली होती. सेंगोलला राजदंड म्हणूनही ओळखले जाते. ते ब्रिटिशांनी 14 ऑगस्ट 1947 च्या रात्री सत्ता हस्तांतरण म्हणून पंडित नेहरूंना सुपूर्द केले होते. 1960 पूर्वी ते आनंद भवनात आणि नंतर 1978 पासून अलाहाबाद संग्रहालयात ठेवण्यात आले होते. 75 वर्षांनंतर सेंगोल संसदेत दाखल झाला होता.









