मौल्यवान वस्तूंची डिजिटल यादी होणार, संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रणही करणार
वृत्तसंस्था / पुरी
ओडिशातील जगन्नाथ मंदिराचा खजिना रविवार, 14 जुलै रोजी दुपारी 1:28 वाजता उघडण्यात आला. ओडिशाच्या मुख्यमंत्री कार्यालयाने याला दुजोरा दिला आहे. यावेळी शासकीय प्रतिनिधी, एएसआय अधिकारी, श्री गजपती महाराजांचे प्रतिनिधी यांच्यासह 11 लोक भांडारगृहात उपस्थित होते. आता या समितीच्या माध्यमातून सरकार रत्न भांडारमध्ये असलेल्या मौल्यवान वस्तूंची डिजिटल यादी करणार आहे. या यादीमध्ये वस्तूंच्या नावासह त्यांचे वजन व अन्य माहितीचा तपशीलही दिला जाणार आहे.
येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराचा खजिना शेवटचा अधिकृतपणे 46 वर्षांपूर्वी 1978 मध्ये उघडण्यात आला होता. त्यानंतर यंदा प्रथमच मंदिराच्या भांडारातील वस्तूंची मोजदाद होणार आहे. तिजोरी उघडण्यापूर्वी प्रशासनाने सहा जड लाकडी चेस्ट मागवले. एक डबा उचलायला आठ ते दहा जण लागले. हे रत्न भांडारात पाठवण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. संपूर्ण कारवाईचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाणार असून ते पूर्णपणे गोपनीय असेल.
11 सदस्यीय समिती
ओडिशा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश विश्वनाथ रथ, श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाचे मुख्य प्रशासक अरविंदा पाधी, एएसआय अधीक्षक डी. बी. गडनायक, पुरीच्या राजा गजपती महाराजाचे प्रतिनिधी यांच्यासह एकूण 11 जणांचा मोजदाद समितीमध्ये समावेश आहे. पर्यवेक्षी पॅनेलमधील दोन सदस्य आणि सेवक समाजातील चार जणांनाही समितीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे.
तिजोरीतील मौल्यवान वस्तूंच्या यादीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती विश्वनाथ रथ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ओडिशा सरकारने ‘एसओपी’ला मान्यता दिली असून तिजोरी उघडण्यापूर्वी तिजोरीच्या मालकाची, देवी बिमला, लक्ष्मी देवी यांची परवानगी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण प्रक्रियेसाठी 3 मानक कार्यप्रणाली (एसओपी) बनवण्यात आल्या आहेत. त्यानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी समितीचे सदस्य दुपारी 12 वाजता पारंपरिक पोशाखात मंदिरात दाखल झाले होते.
सर्प पकडणाऱ्यांना पाचारण
सापांचा समूह भांडारात ठेवलेल्या रत्नांचे रक्षण करतो असेही मानले जाते. त्यामुळेच रत्न भांडार उघडण्यापूर्वी मंदिर समितीने साप पकडण्यात तज्ञ असलेल्या भुवनेश्वर येथील दोन व्यक्तींना पुरी येथे पाचारण केले आहे. मोजदाद करताना सर्प निदर्शनास आल्यास किंवा कोणतीही अप्रिय परिस्थिती निर्माण झाली तर सर्प पकडणाऱ्या व्यक्तींची मदत घेतली जाणार आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी डॉक्टरांचे पथकही सज्ज आहे.
भगवान जगन्नाथाचे मौल्यवान दागिने रत्न भांडारात
श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने उच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार रत्न भांडारमध्ये तीन खोल्या आहेत. 25 बाय 40 चौरस फूट आतील चेंबरमध्ये 50 किलो 600 ग्रॅम सोने आणि 134 किलो 50 ग्रॅम चांदी आहे. हे दागिने कधीही वापरले गेले नाहीत. बाहेरील चेंबरमध्ये 95 किलो 320 ग्रॅम सोने आणि 19 किलो 480 ग्रॅम चांदी आहे. हे सणासुदीला काढले जातात. तर चालू चेंबरमध्ये 3 किलो 480 ग्रॅम सोने आणि 30 किलो 350 ग्रॅम चांदी आहे. हे दागिने व रत्न दैनंदिन विधींसाठी वापरले जातात.









