बेळगाव : दक्षिणेकडील काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगावच्या कपिलेश्वर मंदिरात यावर्षी श्रावण महिन्यानिमित्त जगन्नाथ पुरी अवतरणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अनोखा देखावा सादर करण्यात आला आहे. जगन्नाथ पुरी येथील मंदिराचा देखावा शिवभक्तांना मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये पाहता येणार आहे. याबरोबरच महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगावचे कलाकार वसंत पाटील, विनायक पालकर, बसवराज होनगेकर, राजू लोहार व त्यांच्या टीमने मंदिर परिसर आकर्षकरित्या सजविला आहे. त्यामुळे भाविकांना यावर्षी जगन्नाथ पुरीचा देखावा पाहता येणार आहे. सध्या पावसाळी दिवस असल्याने कपिलेश्वर विसर्जन तलाव तसेच मंदिर परिसरात वॉटरप्रूफ मंडप घालण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना दर्शन घेताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत. रविवारी मध्यरात्री 12.30 वाजता कपिलेश्वर महादेव ट्रस्टच्यावतीने पहिला अभिषेक केला जाणार आहे. सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यंत पंचामृत तसेच इतर अभिषेक केले जाणार आहेत. सकाळी 6 नंतर विशेष रुद्राभिषेक तसेच त्रिकाल पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 7 वाजता पालखी मिरवणूक काढली जाणार आहे.
वॉटरप्रूफ मंडप
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी श्रावणानिमित्त कपिलेश्वर मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी वॉटरप्रूफ मंडप घालण्यात आला आहे. तसेच यावर्षी जगन्नाथ पुरी येथील मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
– अभिजीत चव्हाण (कपिलेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे सदस्य)









