आंध्रप्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कारवाई
वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम
आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर 14 वर्षे जुन्या एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कठोर कारवाई झाली आहे. आंध्रप्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि युवजन श्रमिक रायथु काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांच्या विरोधातील तपासादरम्यान ईडीने 800 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.
जगनमोहन यांच्याकडे असलेल्या 27.5 कोटी रुपयांच्या शेअर्सना अटॅच करण्यात आले आहे. याचबारेबर डालमिया सिमेंट्स (भारत) लिमिटेडच्या जमिनीलाही अटॅच करण्यात आले आहे. या जमिनीची किंमत जवळपास 377.2 कोटी रुपये आहे. तर अटॅच करण्यात आलेल्या संपत्तीचे एकूण मूल्य 793.3 कोटी रुपये असून ईडीने 14 वर्षांनंतर ही कारवाई केली आहे. मनी लॉन्ड्रिंगचे हे प्रकरण लाभ मिळविण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या मदतीचे (क्विड प्रो को) आहे.
2011 मध्ये गुन्हा नोंद
सीबीआयने याप्रकरणी 2011 मध्ये गुन्हा नोंद केला होता. ईडीने सीबीआयकडून नोंद गुन्ह्याची दखल घेत अस्थायी स्वरुपात संपत्ती अटॅच करण्याची कारवाई केली आहे. 31 मार्च रोजी जारी अटॅचमेंट नोटीसवर 15 एप्रिल रोजी कारवाई करण्यात आली आहे.









