लाच स्वरुपात प्राप्त रक्कम पक्षनिधीत जमा झाल्याचा दावा
वृत्तसंस्था/ अमरावती
3200 कोटी रुपयांच्या अबकारी घोटाळ्यावरून आंध्रप्रदेशचे राजकारण तापले आहे. या अबकारी घोटाळ्यात वायएसआर काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचा सहभाग असून घोटाळ्यामुळे दर महिन्याला या नेत्यांनी 50-60 कोटी रुपयांची लाच घेत ही रक्कम पक्षनिधीत देखील जमा केल्याचे एसआयटीच्या रिमांड नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. रिमांड नोटमध्ये मुख्य आरोपी राजशेखर रेड्डी उर्फ राज कसिरेड्डी असल्याचे म्हटले गेले आहे. कसिरेड्डी हा माजी मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेस प्रमुख जगनमोहन रेड्डी यांचा सहकारी आहे. याप्रकरणी माजी मुख्यमंत्री जगनमोहन यांच्यावरही आरोप झाले आहेत.
वायएसआर काँग्रेसच्या नेत्यांनी मद्य ब्रँड्सकडून दर महिन्याला 50-60 कोटी रुपयांची लाच घेतली आणि लाच देणाऱ्या मद्य ब्रँड्सना सरकारी दुकानांच्या माध्यमातून विक्रीत प्राधान्याची सुविधा देण्यात आली. हे रॅकेट 2019 पासून सुरू झाले हेते, ज्याच्याद्वारे दर महिन्याला जमा करण्यात आलेली लाच रक्कम हैदराबाद, मुबई आणि दिल्लीच्या हवाला ऑपरेटर्सद्वारे मिळविण्यात आली.
सरकारी किरकोळ विक्री दुकांद्वारे विक्रीसाठी डिस्टिलरीमधून मद्याच्या खरेदीसाठी ऑर्डर देण्याच्या व्यवस्थेत फेरफार करण्यात आला, यात राष्ट्रीय स्तरावरच्या ब्रँड्सना हटविण्यात आले आणि निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक नव्या ब्रँड्सना ऑर्डर देण्यात आल्या.
वायएसआर काँग्रेसने नाकारले आरोप
वायएसआर काँग्रेस पक्षाने स्वत:वर झालेले सर्व आरोप नाकारत सत्तारुढ तेदेपच्या नेतृत्वाखालील आघाडीवर टीका केली आहे. राजकारणाने प्रेरित होत अबकारी घोटाळ्याची कहाणी रचण्यात आली असून याबद्दल दुष्प्रचार करण्यासाठी प्रसारमाध्यमांचा वापर करण्यात आल्याचे वायएसआर काँग्रेसचे सांगणे आहे.









