भजन, कीर्तन, सत्संग अन् डॉक्युमेंटरीद्वारे महाराजांचा परिचय
बेळगाव : जगद्गुरुत्तम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी शहापूर परिसरात भव्य रथयात्रा काढण्यात आली. भजनामध्ये तल्लीन झालेल्या अनुयायांनी या रथयात्रेमध्ये सहभाग घेतला होता. जात, धर्म, पंथ याचा भेदभाव न करता केवळ ईश्वरासाठी एकत्र आलेल्या सर्व भाविकांनी जगद्गुरुत्तम गुरू कृपालू महाप्रभू यांचा जयघोष केला. शास्त्राrनगर येथील गुजरात भवन येथून सायंकाळी 4.30 च्या सुमारास रथयात्रेला सुरुवात झाली. एसपीएम रोड, आचार्य गल्ली, खडेबाजार शहापूर मार्गे पुन्हा गुजरात भवन या मार्गावर रथयात्रा काढण्यात आली. रथयात्रेमध्ये बेळगाव परिसरातील शेकडो भाविक सहभागी झाले होते. ईश्वराचा जप करत विविध भजने तालबद्धरीत्या सादर करण्यात आली. रथामध्ये जगद्गुरुत्तम कृपालू महाप्रभू यांची प्रतिमा विराजमान होती.
500 हून अधिक भाविकांचा सहभाग
सायंकाळी 7 ते 8 या वेळेत सत्संग आयोजित करण्यात आला होता. यावेळी जगद्गुरुत्तम कृपालू महाराज यांच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंटरी दाखविण्यात आली. त्यानंतर सुश्राव्य कीर्तन सादर करण्यात आले. प्रमुख प्रचारिका ब्रजपरिकरीदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी बेळगावमधील 500 हून अधिक भाविक सहभागी झाले होते. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
जगभर विविध कार्यक्रमांचे आयोजन
आपल्या अगाध तत्वज्ञानामुळे जगद्गुरुत्तम कृपालू महाराज यांनी आध्यात्मिक क्रांती घडविली. त्यामुळेच त्यांना 14 जानेवारी 1957 रोजी काशी विद्वत्परिषत्तर्फे जगद्गुरुत्तम या उपाधीने सन्मानित करण्यात आले. तेव्हा त्यांचे वय केवळ 34 वर्षे होते. याचे औचित्य साधून संपूर्ण जगभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगावमध्येही रथयात्रा व संकीर्तन कार्यक्रम आयोजित केला होता.









