विकासाकरिता तरतूद केलेला निधी वाया : सुशोभिकरणाऐवजी उद्यानांचे विद्रुपीकरण : महापालिका अधिकाऱयांचे साफ दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
मुख्यमंत्री विकास अनुदानाच्या शंभर कोटीमधून शहराच्या विकासाबरोबरच उद्यानांच्या सुशोभिकरणाचा प्रयत्न महापालिकेने केला होता. तसेच उद्यानांच्या विकासाकरिता कोटय़वधी निधीची तरतूद केली होती. मात्र उद्यानांची देखभाल करण्यात अपयश आले आहे. जाधवनगर येथे असलेले उद्यान गवत, झाडे-झुडुपांनी व्यापले आहे. यामुळे देखभालीकरिता मंजूर झालेला निधी कुठे गेला? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
महापालिका व्याप्तीमध्ये सहाशेहून अधिक खुल्या जागा आहेत. यापैकी काही खुल्या जागा उद्यानांसाठी राखीव आहेत. तसेच काही जागा क्रीडांगणांसाठी राखीव आहेत. पण राखीवतेनुसार जागांचा वापर केला जात नाही. कारण महापालिकेच्यावतीने उद्यानांच्या विकासाकरिता कोटय़वधी निधीची तरतूद केली होती. मात्र निधीचा वापर करून कोणत्या उद्यानांचा विकास केला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या शहरातील काही मोजकी उद्याने वगळता सर्वच उद्यानांची दुरवस्था झाली आहे. उद्यानांमध्ये गवत आणि झाडेझुडुपे वाढली असून सुशोभिकरणाऐवजी विद्रुपीकरण झाले आहे.
उद्यानांच्या सुशोभिकरणाकडे दुर्लक्ष
महापालिकेच्या अधिकाऱयांनी काही मोजक्या उद्यानांत सुशोभिकरण केले आहे. पण उद्यानांच्या देखरेखीबाबत आपली जबाबदारी झटकली आहे. यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. काही उद्यानांत विकासकामे करण्यात आली. मात्र बहुतांश उद्यानांच्या सुशोभिकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. फिरावयास येणाऱया नागरिकांकरिता पदपथ तयार करण्यात आला. मात्र गेल्या काही दिवसांपासून स्वच्छतेचे काम व देखभालीचे काम करण्यात आले नाही. यामुळे उद्यानात गवत आणि झाडे उगवून दुरवस्था झाली आहे. गवतामुळे पहाटे आणि सायंकाळी फिरावयास येणाऱया नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. तसेच उद्यानातील गवतामुळे सापकिडय़ांचा वावर वाढला आहे. लहान मुलांसाठी खेळाचे साहित्य बसविण्यात आले आहे. पण अशा धोकादायक उद्यानामध्ये लहान मुलांना किंवा वृद्धांना जाणे असुरक्षित बनले आहे. तरीदेखील महापालिकेच्या अधिकाऱयांनी याकडे साफ दुर्लक्ष केल्याची टीका नागरिक करीत आहेत.
निधीचा गैरवापर होत आहे का?
उद्यानाच्या देखभालीकरिता तरतूद केलेला निधी कुठे गेला? असा मुद्दा निर्माण झाला असून निधीचा गैरवापर होत आहे का? असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. काही मोजक्मयाच उद्यानांच्या देखभालीकरिता कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण जाधवनगर परिसरातील उद्यानाच्या देखभालीकरिता कामगारांची नियुक्ती करण्यात आली नसल्याने उद्यानाची दुरवस्था झाली आहे.









