पहिली कसोटी पहिला दिवस : ऑस्ट्रेलियाचा 177 धावांत धुव्वा, भारत 1 बाद 77, रोहित शर्माचे नाबाद अर्धशतक

वृत्तसंस्था /नागपूर
अष्टपैलू रवींद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झोकात केलेले पुनरागमन आणि कर्णधार रोहितने आक्रमक फटकेबाजी करीत नोंदवलेले नाबाद अर्धशतक यांच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजविले. जडेजाने 5 बळी मिळवित पहिला दिवस गाजविला तर रोहित 56 धावांवर खेळत आहे. याशिवाय अश्विनने 3 बळी मिळविले.
फिरकीस अनुकूल असणाऱया जामठा खेळपट्टीचा पुरेपूर लाभ घेत 22 षटकांत 11 व्यांदा पाच बळी टिपण्याच्या पराक्रम केला. त्याच्या या कामगिरीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 177 धावांत गुंडाळता आले. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांच्या फलंदाजांनी फिरकीसमोर शरणागती पत्करल्याचे दिसून आले. त्यांच्या केवळ चारच फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. मालिकेआधी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना मनात जडेजापेक्षा रविचंद्रन अश्विनचीच जास्त धास्ती होती. त्यानेही 15.5 षटकांत 3 बळी मिळवित जडेजाला चांगली साथ दिली. या दरम्यान त्याने कसोटीतील 450 बळींचा टप्पाही गाठला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा रोहित शर्मा 69 चेंडूत नाबाद 56 धावांवर खेळत होता, त्यात 9 चौकार, एका षटकाराचा समावेश आहे. केएल राहुल 23 व्या षटकात बाद झाल्यानंतर आर. अश्विन नाईट वॉचमन म्हणून खेळावयास आला आहे. त्याने एकही धाव काढलेली नाही. भारताने 1 बाद 77 धावा जमविल्या असून ते अजून 100 धावांनी ऑस्ट्रेलियाच्या मागे आहेत.
राहुलचा खराब फॉर्म पुढे चालू राहिला असून ऑस्ट्रेलियाचा पदार्पणवीर टॉड मर्फीने त्याला स्वतःच्याच गोलंदाजीवर बाद केले. तो 71 चेंडू खेळला, त्यात त्याने 1 चौकारासह 20 धावा जमविल्या. खेळपट्टी आणखी खराब होत जाणार हे लक्षात घेत रोहितने नाथन लियॉनवर हल्ला चढविला त्याचा त्याला फायदा झाला. लियॉनला त्याने मारलेले दोन फटके त्याचा दर्जा आणि अधिकार दाखवून देणारे होते. त्याचा फॉरवर्ड डिफेन्सिव्ह जॅब गोलंदाज व मिडऑफ यांच्यामधून रॉकेटसारखा सीमारेषेपार गेला तर दुसरा फटका पुढे सरसावत येत षटकारासाठी धाडला. या खेळपट्टीवर बचावात्मक मानसिकतेने खेळल्यास जास्त वेळ टिकता येणार नाही. त्यामुळे जलद धावा करण्याचे धोरणच योग्य ठरणारे आहे, हे रोहितने दाखवून दिले.
जडेजाचे मात्र कौतुक करण्यासारखे आहे. सचिन तेंडुलकरने तर त्याला कम्प्लिट पॅकेज म्हटले आहे. जेव्हा भारत विदेशात खेळतो तेव्हा तो फलंदाज ऑलराऊंडर असतो, अनेकदा त्याने सहाव्या क्रमांकावर येऊन संघाला वाचवण्याचा प्रयत्न केलाय तर देशी खेळपट्टय़ांवर तो निव्वळ घातक ठरतो. गुडघ्यावरील शस्त्रक्रिया आणि सहा महिन्यांच्या विश्रांतीचा त्याच्या कौशल्यावर काहीही परिणाम झाला नसल्याचे त्याने दाखवून दिले. ऑस्ट्रेलियाने अश्विनसाठी तयारी केली होती. त्याचे चापल्य व वैविध्य यावरच त्यांनी जास्त लक्ष केंद्रित केले आणि फिरकीस अनुकूल ठरणाऱया खेळपट्टीवर होऊ शकणाऱयाच्या जडेजाच्या प्रभावाकडे त्यांचे दुर्लक्षच झाले. टर्निंग विकेटवर गोलंदाज बोटांनी जास्त कमाल करण्याचा प्रयत्न करीत नाहीत. चेंडूचा टप्पा क्रॅक्सवर पडला की खेळपट्टी उर्वरित काम करते, त्यामुळे टर्नर्स खेळपट्टय़ा जास्त धोकादायक असतात.
ऑस्ट्रेलियन फलंदाजांची हाराकिरी
टर्न व बाऊन्स या ठिकाणी होता, हे जरी खरे असले तरी ऑस्ट्रेलियन फलंदाजांनीही खराब फटक्यांची निवड केली. गोलंदाज डोक्यात असल्यामुळे खेळपट्टीला हाताळण्याचा त्यांनी जास्त प्रयत्न केला. लाबुशेनला मात्र जडेजाचा अप्रतिम चेंडू पडला. इतरांकडून मात्र खराब फटके मारले किंवा जज करण्यात त्यांच्याकडून चुका झाल्या. टॉस्डअप केलेल्या चेंडूने लाबुशेनला पुढे खेचले. त्यावेळी क्रॅकवर चेंडू पडल्यानंतर किंचित उसळला आणि वळून मागे गेला. पदार्पणवीर यष्टिरक्षक केएस भरतने ही संधी साधत त्याला यष्टिचीत केले. पहिल्या सत्रात जडेजाचे चेंडू अडवताना भरतला झगडावे लागले. पण नंतर त्याने आपल्या स्टान्समध्ये बदल केला, याबद्दल त्याचे कौतुक झाले.
लाबुशेनने स्टीव्ह स्मिथसमवेत 82 धावांची भागीदारी केल्यानंतर विकेट पडण्याचा सपाटा सुरू झाला. मॅट रेनशा जडेजा बळी ठरला स्मिथ (37) जडेजाचा आर्मबॉल ओळखण्यात चूक केली आणि बॅट-पॅडमधून चेंडूने त्याचा त्रिफळा उडवला तेव्हा तो चकित झाला. 2 बाद 84 अशा स्थितीनंतर लवकरच त्यांची स्थिती 5 बाद 109 अशी झाली. पीटर हॅन्ड्सकॉम्ब (29) व प्रतिहल्ला करणारा ऍलेक्स कॅरे (36) यांनी काही जलद धावा जमविल्याने संघाला 150 चा टप्पा पार करता आला. अश्विन राऊंड द विकेट गोलंदाजी करतो. कॅरेने त्याला रिव्हर्स स्वीपचा फटका मारला तर पॅट कमिन्स स्लिपमधील कोहलीकडे झेल देत बाद झाला. अश्विनचा हा दुसरी बळी होता.
त्याआधी लाबुशेन व स्मिथ यांनी पहिल्या सत्रात भारतीय स्पिनर्सना आत्मविश्वासाने हाताळले होते. त्यामुळे प्रारंभीच्या धक्क्यानंतर उपाहारापर्यंत त्यांनी 2 बाद 76 धावांची मजल मारून दिली होती. शमी व सिराज यांनी उस्मान ख्वाजा (1) व डेव्हिड वॉर्नर (1) यांना झटपट बाद केले. सिराजने ख्वाजाला पायचीत केले. पण पंचांनी त्याचे अपील फेटाळले. सिराजला खात्री होती. पण रोहितने यष्टिरक्षक कोना भरतला विचारून अखेरच्या क्षणी डीआरएसची मागणी केली आणि त्यात ख्वाजा बाद असल्याचा निर्णय मिळाला. ऑस्ट्रेलियाचे शेवटचे पाच गडी केवळ 15 धावांत बाद झाले. जडेजाने 47 धावांत 5 तर अश्विनने 42 धावांत 3 बळी मिळविले.
450 बळी मिळविणारा अश्विन बनला दुसरा फास्टेस्ट बॉलर

पहिल्या दिवशी 5 बळी मिळविणारा स्टार गोलंदाज आर. अश्विनने विक्रम बुकात आपले नाव नोंदवताना कसोटीत 450 बळींचा टप्पा जलद गाठणारा दुसऱया क्रमांकाचा गोलंदाज बनला. लंकेच्या मुथ्थय्या मुरलीधरनने सर्वात जलद 80 कसोटीत हा टप्पा गाठण्याचा विक्रम केला तर अश्विनने 89 कसोटीत हा पराक्रम केला. कॅरेला बाद करून त्याने हा टप्पा गाठला. 450 बळी मिळविणारा भारताचा तो अनिल कुंबळेनंतरचा दुसरा गोलंदाज आहे. भारतातर्फे सर्वात जलद 450 मिळविणारा तो पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज बनला आहे. याआधी अनिल कुंबळेने 93 कसोटीत हा पराक्रम केला होता.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया प.डाव 63.3 षटकांत सर्व बाद 177 : वॉर्नर 1, ख्वाजा 1, लाबुशेन 49 (123 चेंडूत 8 चौकार), स्मिथ 37 (107 चेंडूत 7 चौकार), रेनशॉ 0, हँड्सकॉम्ब 31 (84 चेंडूत 4 चौकार), ऍलेक्स कॅरे 36 (33 चेंडूत 7 चौकार), कमिन्स 6, मर्फी 0, लियॉन 0, बोलँड 1, अवांतर 15. गोलंदाजी : शमी 1-18, सिराज 1-30, जडेजा 5-47, अश्विन 3-42, अक्षर पटेल 0-28.
भारत प.डाव 24 षटकांत 1 बाद 77 : रोहित शर्मा खेळत आहे 56 (69 चेंडूत 9 चौकार, 1 षटकार), केएल राहुल 20 (71 चेंडूत 1 चौकार), अश्विन खेळत आहे 0, अवांतर 1. गोलंदाजी : कमिन्स 4 षटकांत 27 धावा, लियॉन 10 षटकांत 33 धावा, मर्फी 1-13 (7 षटके).









