लॉर्ड्स जिंकण्याचे स्वप्न भंगले : टीम इंडियाने हातातली मॅच घालवली : तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा 22 धावांनी विजय
वृत्तसंस्था/ लंडन
लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर झालेला तिसरा कसोटी सामना बेन स्टोक्सच्या नेतृत्वातील इंग्लंडने पाचव्या दिवशी अवघ्या 22 धावांनी जिंकला. या विजयासह 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने टीम इंडियासमोर 193 धावांचे आव्हान ठेवले होते मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले. केएल राहुलनंतर रवींद्र जडेजाने संघर्ष केला, मात्र त्यांना दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. भारतीय संघ दुसऱ्या डावात 170 धावांत ऑलआऊट झाला आणि इंग्लंडने हा सामना जिंकला.

लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात 387 धावांची दमदार खेळी केली, त्याला भारतानेही तितक्याच धावांनी म्हणजे 387 धावांनी प्रत्युत्तर दिले. यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात भारतापुढे 193 धावांचं आव्हान उभं केलं, पण पाचव्या दिवशी एकामागोमाग एक विकेट्स कोसळल्या आणि भारताचा डाव अवघ्या 170 धावांवर आटोपला. विशेष म्हणजे, लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर इंग्लंडनी आपल्या अनुभवाचा आणि परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेतला आणि विजय मिळवला.
इंग्लंडने भारतासमोर 193 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने चौथ्या दिवस अखेर 17.4 षटकात 4 बाद 58 धावा केल्या होत्या. यामुळे पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी 135 धावांची गरज होती, तर इंग्लंडला 6 विकेट्सची गरज होती. पाचव्या दिवशी केएल राहुलला साथ देण्यासाठी ऋषभ पंत उतरला. त्याने सकारात्मक सुरुवातही केली. मात्र, 21 व्या षटकात जोफ्रा आर्चरने पंतला चकवले आणि 9 धावांवर त्रिफळाचीत केले. यानंतर काही वेळातच जम बसलेल्या केएल राहुलला बेन स्टोक्सने पायचीत पकडले. केएलने 58 चेंडूत 39 धावांचे योगदान दिले.

जडेजाचा संघर्ष वाया
वॉशिंग्टन सुंदरलाही फार काळ जोफ्रा आर्चरने टिकू दिले नाही. नंतर जडेजाला साथ देण्यासाठी नितीश कुमार रे•ाr आला. या दोघांनी बराच काळ संयमी खेळ करत डाव पुढे नेला पण, नितीशही फारसा चमत्कार दाखवू शकला नाही. 13 धावा करुन तो माघारी परतला. यामुळे लंचब्रेकपर्यंत भारताची 8 बाद 112 अशी स्थिती होती. लंच ब्रेकनंतर जडेजाने धावा काढण्याचा प्रयत्न केला, त्याला काही काळ जसप्रीत बुमराहने साथ दिली. त्या दोघांनी अगदी धीम्या गतीने खेळत इंग्लिश गोलंदाजांना संयम पाहिला. ही जोडी फोडण्यासाठी इंग्लंडने जवळपास सर्व गोलंदाजांचा वापर केला. पण अखेर 62 व्या षटकात बुमराहला स्टोक्सने बाद केले. बुमराहने 54 चेंडू खेळताना 5 धावा केल्या. त्याने जडेजाची चांगली साथ देताना 35 धावांची भागीदारी 9 व्या विकेटसाठी केली. शेवटच्या विकेटसाठी मोहम्मद सिराज जडेजाला साथ देण्यासाठी आला होता. यादरम्यान, जडेजाने सलग चौथे अर्धशतकही ठोकले. पण, सिराज दुर्दैवीरित्या बाद झाला आणि भारताचा दुसरा डाव 170 धावांवर गुंडाळला गेला. विशेष म्हणजे, जडेजाने नाबाद 61 धावांची खेळी साकारताना विजयाच्या आशा निर्माण केल्या होत्या, पण इतर फलंदाजाकडून त्याला साथ मिळाली नाही. अखेरीस इंग्लंडने 23 धावांनी सामना जिंकला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड पहिला डाव 387, दुसरा डाव 192
भारत पहिला डाव 387 आणि दुसरा डाव 74.5 षटकांत सर्वबाद 170 (यशस्वी जैस्वाल 0, केएल राहुल 39, करुण नायर 14, शुभमन गिल 6, ऋषभ पंत 9, रविंद्र जडेजा 181 चेंडूत नाबाद 61, नितीश कुमार रे•ाr 13, बुमराह 5, सिराज 4, जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स प्रत्येकी तीन बळी, कार्से 2 बळी, ख्रिस वोक्स, शोएब बशीर प्रत्येकी 1 बळी).
लॉर्ड्सवर पुन्हा राडा
कसोटीच्या पाचव्या दिवशी लॉर्ड्सच्या मैदानात पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. रवींद्र जडेजा आणि ब्रायडन कार्से यांच्यात धाव घेताना शाब्दिक वाद झाला आणि क्षणभर मैदानावरचे वातावरण तापले. ही घटना कार्सेच्या ओव्हरमध्ये घडली. कार्सेच्या षटकात रवींद्र जडेजा ऑफ साईडवर शॉट मारून धावण्यासाठी धावला. यादरम्यान, जडेजा चेंडू पाहत धावत होता आणि कार्से त्याच्यामध्ये आला. दोघेही एकमेकांना धडकले. यावेळी कार्से पुन्हा जडेजाला काहीतरी म्हणाला. यानंतर, जडेजा संतापल्याचे पहायला मिळाले. या प्रसंगानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने तत्काळ हस्तक्षेप करत दोघांनाही शांत केले आणि सामना पुन्हा सुरळीत सुरू झाला.
आक्रमक सेलिब्रेशन करणे पडले महागात, सिराजवर कारवाईचा बडगा
सामन्याच्या चौथ्या दिवशी बेन डकेटला बाद केल्यानंतर, मोहम्मद सिराजने आक्रमक सेलिब्रेशन केले होते. याचा फटका मोहम्मद सिराजला बसला आहे. आयसीसीने सिराजवर मोठी कारवाई केली आहे. लॉर्ड्स कसोटीतील चौथ्या दिवशी गोलंदाजी करताना सिराजने बेन डकेटला बाद करत माघारी धाडले. बेन डकेटला बाद केल्यानंतर, सिराज डकेटजवळ गेला आणि आक्रमक सेलिब्रेशन करताना दिसून आला. यादरम्यान तो डकेटला काहीतरी म्हणाला. हे आयसीसीच्या आचारसंहितेच्या नियमाच्या विरोधात आहे. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, हा कोड ऑफ कंडक्ट लेव्हल 1 मधील आर्टीकल 2.5 चे उल्लंघन आहे. यामुळे सिराजवर मॅच फीच्या 15 टक्के दंड आकारण्यात आला आहे. यासह एक डिमेरिट पॉईंट देखील देण्यात आला आहे.









