मनी लाँड्रिंग प्रकरण ः अंतरिम जामीन कालावधीत वाढ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मनी लाँड्रिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा अंतरिम जामीन 10 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. पटियाला हाऊस न्यायालयाने शनिवार, 22 ऑक्टोबर रोजी जामीन याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला आहे. सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात सध्या सुरू असलेल्या ईडीच्या तपासात जॅकलिन महत्त्वाची साक्षीदार आहे. याआधी 26 सप्टेंबर रोजी न्यायालयाने जॅकलिनच्या अर्जावर सुनावणी केल्यानंतर 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्मयावर अंतरिम जामीन मंजूर केला होता. न्यायालयाने जॅकलिनच्या जामीन अर्जावर अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) उत्तरही मागवले होते. जोपर्यंत त्यांचा जबाब मिळत नाही तोपर्यंत त्यांचा नियमित जामीन न्यायालयात प्रलंबित राहील, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी सांगितले होते.
मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने 17 ऑगस्ट रोजी आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रामध्ये जॅकलिनचे नाव आरोपी म्हणून होते. आरोपानुसार, तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असताना सुकेशने एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून खंडणी उकळली होती. ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत जॅकलिनचे जबाबही नोंदवले आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार सुकेशच्या 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन महत्त्वाची साक्षीदार आहे.









