जॅक मॅकगर्कचे वनडेतील जलद शतक
वृत्तसंस्था/ अॅडलेड
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू जॅक फ्रेजर-मॅकगर्कने लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक नोंदवण्याचा पराक्रम केला. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रीय वनडे सामन्यात दक्षिण ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळताना मॅकगर्कने केवळ 29 चेंडूत शतक झळकवले.
द. ऑस्ट्रेलिया आणि टास्मानिया यांच्यात हा वनडे सामना कॅरेन रोल्टन ओव्हल मैदानावर रविवारी खेळवला गेला. टास्मानियाने प्रथम फलंदाजी करताना या सामन्यात 9 बाद 435 धावा झळकवल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना द. ऑस्ट्रेलियाच्या डावातील 8 व्या षटकात मॅकगर्कने हे जलद शतक झळकवले. त्याने आपल्या या 125 धावांच्या खेळीमध्ये 13 षटकार आणि 10 चौकार ठोकले. 21 वर्षीय मॅकगर्कने केवळ 18 चेंडूत पहिले अर्धशतक तर त्यानंतर त्याला शतक पूर्ण करण्यासाठी आणखी 18 चेंडू खेळावे लागले. मॅकगर्कने एका षटकात 32 धावा झोडपल्या. ऑस्ट्रेलियातील राष्ट्रीय वनडे क्रिकेट स्पर्धेतील टास्मानियाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. मॅकगर्कने द. आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू ए बी डिव्हिलियर्सने 2015 साली विंडीजविरुद्धच्या सामन्यात नोंदवलेल्या 31 चेंडूत शतकाचा विक्रम मागे टाकला. तसेच सध्या भारतात सुरू असलेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी झालेल्या लंकेविरुद्धच्या सामन्यात द. आफ्रिकेच्या अॅडेन मार्व्रेमन 49 चेंडूत शतक झळकवले होते. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासातील मार्व्रेमचे हे सर्वात जलद शतक आहे.









