वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लिच याला गेल्या कांही दिवसांपासून गुडघे दुखापतीची समस्या सातत्याने जाणवत असल्याने तो इंग्लंड संघाचा सध्या सुरू असलेल्या भारत दौऱ्यातील 4 कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध होऊ शकला नाही. मात्र या दौऱ्यातील हैदराबादच्या पहिल्या कसोटीत त्याने आपला सहभाग दर्शविला होता आणि इंग्लंडने ही कसोटी 28 धावांनी जिंकली होती. लिचच्या या गुडघा दुखापतीवर मंगळवारी शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
32 वर्षीय लिचला ही दुखापत पहिल्या कसोटीत खेळताना झाली होती. त्याच्या गुडघ्याला सूज झपाट्याने आल्याने त्याला वेदना अधिक होऊ लागल्या. लिचने तातडीने हा दौरा अर्धवट सोडून मायदेशी प्रयाण केले. लिचच्या गुडघ्यावर मंगळवारी एका खासगी रुग्णालयात तंज्ञ डॉक्टर शस्त्रक्रिया करणार असल्याचे वृत्त बीबीसीने प्रसिद्ध केले आहे. इंग्लंडचा संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर कसोटीत मालिका खेळत आहे. या मालिकेतील शेवटचा आणि पाचवा सामना धर्मशाला येथे होणार आहे. या मालिकेत यजमान भारताने इंग्लंडवर 3-1 अशी विजयी घेतली आहे. आता या दौऱ्यानंतर इंग्लंड संघ पुढील कसोटी मालिका मायदेशात खेळणार असून या मालिकेतील पहिली कसोटी 10 जुलै रोजी लॉर्डस मैदानावर होणार आहे.









