कोको गॉफ, टोमलानोविक, किर्गीओस, मॅटेव बेरेटिनी स्पर्धेबाहेर
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
टय़ुनिशियाची ऑन्स जेबॉर ही अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारी पहिली आफ्रिकन महिला बनली आहे. तिच्यासह फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सियाने महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठताना अमेरिकेची युवा खेळाडू कोको गॉफचे आव्हान संपुष्टात आणले. पुरुष एकेरीत कॅरेन खचानोव्हने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गीओसची घोडदौड रोखत शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले तर कॅस्पर रूडनेही उपांत्य फेरी गाठली असून त्याने इटलीच्या मॅटेव बेरेटिनीवर मात केली.

पाचव्या मानांकित जेबॉरने गेल्या जुलैमध्ये विम्बल्डनची अंतिम फेरी गाठत या स्पर्धेत इथवर मजल मारणारी पहिली आफ्रिकन महिला होण्याचा मान मिळविला होता. त्यात आता अमेरिकन ओपनची भर पडली आहे. जेबॉरने उपांत्यपूर्व लढतीत ऑस्ट्रेलियाच्या ऍला टोमलानोविकचा 6-4, 7-6 (7-4) असा पराभव केला. टोमलानोविकने तिसऱया फेरीत अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचे आव्हान संपवले होते. पण तिचा हा जोम जेबॉरविरुद्धच्या लढतीत टिकला नाही. 28 वर्षीय जेबॉरचे आक्रमण व पकड ढिली होऊ न देण्याची वृत्ती यापुढे तिला हार पत्करावी लागली. ‘विम्बल्डनची अंतिम फेरी गाठल्यापासून स्व-विश्वास खूप वाढला आहे आणि त्यावेळी जरी अंतिम फेरीत रिबाकिनाकडून हरले असले तरी माझ्यात ग्रँडस्लॅम जिंकण्याची क्षमता असल्याची खात्री त्यातून मला वाटू लागली, हा सकारात्मक बदल माझ्यात झाला आहे,’ असे जेबॉर म्हणाली. टय़ुनिशियामध्ये तिचे चाहते तिला ‘मिनिस्टर ऑफ हॅप्पीनेस’ म्हणतात. या खेळातील तिच्या प्रगतीमुळे तिचे देशवासी आनंदी होत असल्याने तिला तसे म्हटले जाते. जेबॉरची उपांत्य लढत कॅरोलिन गार्सियाशी होईल.
गार्सिया शेवटच्या चारमध्ये
17 वे मानांकन असलेल्या गार्सियाने अमेरिकेच्या 18 वर्षीय गॉफचा 6-3, 6-4 असा पराभव करून तिचा स्वप्नभंग केला. ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठण्याची गार्सियाची ही पहिलीच वेळ आहे. गॉफच्या अनपेक्षित पराभवामुळे तिला ही संधी मिळाली आहे. साहजिकच ती अतिशय खुश झाली आहे. ‘मला सध्या काय वाटते हे मी शब्दांत सांगू शकत नाही, इतकी मी आनंदित झाले आहे,’ असे ती नंतर म्हणाली. या स्पर्धेत उतरण्याआधी तिने सिनसिनॅटी मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. त्यामुळे हा तिचा सलग 13 वा विजय ठरला आहे. पूर्ण फिटनेस मिळविल्यामुळे मला हे यश मिळत आहे, असे 28 वर्षीय गार्सियाने सांगितले. गेल्या जूनमध्ये घोटय़ाची दुखापत झाल्यानंतर तिला टेनिसमधून दोन महिने ब्रेक व्यावा लागला होता. पराभवाने गॉफ निराश झाली असली तरी या स्पर्धेत पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारता आली, याबद्दल तिने समाधान व्यक्त केले. यापुढे मजल मारण्यासाठी मला आणखी कठोर मेहनत घ्यावी, हा धडा मला त्यातून मिळालाय. त्यादृष्टीने आता प्रयत्न करणार असल्याचेही ती म्हणाली. 2019 अमेरिकन ओपन व 2020 ऑस्ट्रेलियन ओपन या दोन स्पर्धांत जेबॉर व गार्सिया यांची याआधी गाठ पडली होती, त्या दोन्ही वेळेस जेबॉरनेच बाजी मारली होती. गार्सियाला ही मालिका खंडित करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे.
खचानोव्ह पहिल्यांदाच उपांत्य फेरीत
पुरुष एकेरीत रशियाच्या 27 व्या मानांकित कॅरेन खचानोव्हने ग्रँडस्लॅम स्पर्धेची पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठताना ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गीओसचे आव्हान 7-5, 4-6, 7-5, 6-7 (3-7), 6-4 असे संपुष्टात आणले. मॅचपॉईंटवर त्याने बिनतोड सर्व्ह करीत हा सामना संपवला. किर्गीओसने चौथ्या फेरीत रशियाच्या अग्रमानांकित डॅनील मेदवेदेव्हला हरवून स्पर्धेबाहेर घालविले होते. पण दुसऱया रशियन खेळाडूवर त्याला तशी वेळ आणता आली नाही. पाच सेट्समध्ये जिंकलेला खचानोव्हचा हा सलग दुसरा सामना आहे. त्याची उपांत्य लढत नॉर्वेच्या कॅस्पर रूडशी होणार आहे.
रूडची बेरेटिनीवर मात
फॉर्ममध्ये असलेल्या पाचव्या मानांकित कॅस्पर रूडने इटलीच्या मॅटेव बेरेटिनीवर 6-1, 6-4, 7-6 (7-4) अशी मात केली. रूड हा प्रेंच ओपनचा उपविजेता आहे. मेदवेदेव्ह याआधीच पराभूत झाला असल्याने रूडला आता मानांकनात अल्कारेजप्रमाणे अग्रस्थानावर झेप घेण्याची संधी आहे. पहिल्या सेटमध्ये बेरेटिनी पूर्णपणे निष्प्रभ ठरला. दुसऱया सेटमध्ये त्याला थोडा सूर गवसला असला तरी तो सेट जिंकू शकला नाही. तिसऱया सेटमध्ये मात्र त्याने जोरदार प्रतिकार केला आणि सेट टायब्रेकरवर नेला. मात्र टायब्रेकरमध्ये कडवी लढत देऊनही बेरेटिनीला सेटसह सामना गमवावा लागला.









