वार्ताहर/हिंडलगा
बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत हद्दीतील अयोध्यानगर, गणेशपूर येथील गिजरे प्राईम केअर हॉस्पिटलमध्ये श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर नूतन आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन मोठ्या थाटात करण्यात आले. या उद्घाटन समारंभाला कर्नाटक राज्य इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. व्ही. व्ही. चिनीवालर, प. पू. गुरुसिद्ध स्वामीजी (कारंजीमठ), कर्नाटक राज्य युवा काँग्रेसचे अध्यक्ष मृणाल हेब्बाळकर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत डॉ. दत्तप्रसाद गिजरे, डॉ. समर्थ गिजरे, डॉ. मंजुषा गिजरे, डॉ. ग्रिष्मा कुलकर्णी-गिजरे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, फळपेटी व धन्वंतरी मूर्ती भेट देऊन करण्यात आले. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प. पू. गुरुसिद्ध स्वामीजी यांच्या हस्ते ‘आयव्हीएफ’ केंद्राचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
प्रास्ताविक मनोगत डॉ. दत्तप्रसाद गिजरे यांनी करून विविध कक्षांची माहिती दिली. याप्रसंगी गुरुसिद्ध स्वामीजी यांनी आशीर्वचनपर शुभेच्छा दिल्या व ग्रामीण जनतेची आपण या भागात उत्तम सेवा द्यावी, असे सांगितले. डॉ. व्ही. व्ही. चिनीवालर व युवा काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांची शुभेच्छापर भाषणे झाली. डॉ. शाम कुलकर्णी यांनीही शुभेच्छा दिल्या. डॉ. समर्थ गिजरे यांनी आभार मानले. डॉ. मंजुषा गिजरे यांनी सूत्रसंचालन करून हॉस्पिटलमार्फत देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती उपस्थितांना करून दिली. कार्यक्रमाला बेळगाव व ग्रामीण भागात सेवा देणारे डॉक्टर, उद्योजक, विविध संस्थांचे पदाधिकारी व येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









