डीजीएमओंचे प्रतिपादन : पाकिस्तान लष्कराने दहशतवाद्यांची बाजू घेतल्याने त्याची प्रचंड हानी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारताचा संघर्ष दहशतवाद्यांशी आहे. तो अन्य कोणाशीही नाही. तथापि, पाकिस्तानच्या लष्काराने दहशतवाद्यांची बाजू घेतल्याने त्यालाही जोरदार दणका द्यावा लागला, अशी स्पष्टोक्ती भारताच्या सैनिकी कार्यवाही संचालकांनी (डीजीएमओ) केली आहे. सोमवारी त्यांनी पत्रकार परिषदेत ‘ऑपरेशन सिंदूर’ अभियानावर आणखी प्रकाश टाकला. या अभियानाने आपली पूर्वनिर्धारित ध्येये पूर्ण केली आहेत. मात्र, पाकिस्तानने आणखी कुरापती काढल्यास त्याला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
भारताने चढविलेल्या प्रतिहल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले. पाकिस्तानच्या 11 वायुतळांचा विध्वंस झाला. पाकिस्तानची काही युद्धविमाने पाडविण्यात आली आणि किमान 35 ते 40 सैनिक आणि अधिकारी यांना कंठस्नान घालण्यात आले. कराची बंदरावर हल्ला करुन ते उद्ध्वस्त करण्यासाठीही सज्जता करण्यात आली होती. त्यामुळे पाकिस्तानला बचावात्मक भूमिका घ्यावी लागली. पाकिस्तानची जवळपास सर्व वायुसुरक्षा यंत्रणा नष्ट करण्यात आली. विशेषत: रावळपिंडी येथील वायुतळ उद्ध्वस्त झाल्याचा जबरदस्त दणका पाकिस्तानला बसला आहे, अशी माहिती एअर मार्शल ए. के. भारती यांनी दिली.
लष्करावर का केला हल्ला…
7 मे ते 10 मे या चार दिवसांमध्ये झालेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सशस्त्र संघर्षात भारताचे प्रथम ध्येय केवळ पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा खात्मा हेच होते. त्यासाठी भारताने दहशतवाद्यांच्या महत्वाच्या 9 तळांवर 7 मे या दिवशी अत्याधुनिक बॉम्ब आणि क्षेपणास्त्रे याच्या साहाय्याने प्रचंड हल्ला चढविला होता. हा हल्ला शतप्रतिशत यशस्वी ठरला. 100 हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. तथापि, पाकिस्तानच्या लष्करी व्यवस्थेने भारताच्या कुरापती काढण्यास प्रारंभ केला. भारतातील अनेक नागरी वस्त्यांना लक्ष्य करण्यात आले. भारताच्या सेना तळांवर आणि वायुतळांवर स्फोटक ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रे सोडण्यात आली. मात्र, हा हल्ला पूर्ण: निकामी करण्यात आम्ही यशस्वी ठरलो. आमची वायुसुरक्षा प्रणाली आणि क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा यांनी आपले श्रेष्ठत्व आणि उत्युच्च गुणवत्ता सिद्ध केली. जेव्हा पाकिस्ताच्या लष्करी व्यवस्थेने अतिरेक केला, तेव्हा तिलाही भारताच्या सामर्थ्याचा तडाखा द्यावा लागला, अशी वस्तुस्थिती एअर मार्शल ए. के. भारती यांनी स्पष्ट केली.
‘आकाश’चे कौतुक
भारताच्या स्वदेशनिर्मित ‘आकाश’ या वायुसुरक्षा प्रणालीने आपली उपयुक्तता आणि परिणामकारता युद्धभूमीवर सिद्ध केली आहे. आम्ही ही यंत्रणा निर्माण करू शकलो, याचे कारण केंद्र सरकारने दिलेले प्रोत्साहन आणि अर्थपुरवठा हे आहे. केंद्र सरकारचे धोरणही आम्हाला अत्यंत प्रोत्साहक ठरले आहे, अशा शब्दांमध्ये एअर मार्शल भारती यांनी आकाश प्रणालीचे आणि सरकारचे कौतुक केले.
मानवरहित साधनांची कामगिरी
पाकिस्तानातील दहशतवादी तळ भारताने उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानच्या लष्करी व्यवस्थेने भारतावर स्फोटक ड्रोन्सच्या धाडींवर धाडी टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच काही क्षेपणास्त्रेही सोडण्यात आली. तथापि, स्वदेशनिर्मित वायुसंरक्षण साधनांनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करत पाकिस्तानची सर्व ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रे धाराशायी केली. हे कार्य अवघड होते. पण ते साध्य करण्यात आम्हाला यश आले आहे. कारण आमची साधनसामग्री श्रेष्ठ होती, असे प्रतिपादन त्यांनी केले.
सर्व तळ सुरक्षित
या संघर्षात भारताच्या सैन्य सुविधांची कोणतीही हानी झाली नाही. आमची सर्व यंत्रणा उत्तम रितीने कार्यरत असून कोणतीही आव्हाने परतविण्यास सज्ज आणि समर्थ आहे. आम्हाला कार्यवाहीचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. त्यामुळे पाकिस्तानने पुन्हा गडबड करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही त्याचा पुरता बिमोड करण्यास मागेपुढे पहाणार नाही, अशी स्पष्टोक्ती त्यांनी यावेळी केली. ‘ऑपरेशन सिंदूर’ची कार्यवाही कशी झाली, याचीही विस्तृत माहिती त्यांनी दिली.
काय काय गमावले पाकिस्तानने…
ड जवळपास सर्व वायुसुरक्षा आणि रडार यंत्रणा, तसेच 11 वायुतळ
ड किमान 35 ते 40 पाकिस्तानी सैनिक, तसेच त्यांचे अधिकारी
ड शंभरहून अधिक दहशतवादी, त्यांचे म्होरके, प्रशिक्षक आणि शस्त्रे









