खाकी वर्दीत अहोरात्र नागरिकांचे संरक्षण करणारा पोलीस कर्मचारी हा आभासी जगतातील पांडू नाही तर पांडुरंग आहे. या खाकी वर्दीमुळे तो कलियुगातील राक्षसांना आपला शत्रू वाटत आहे तर अनेकांना पांडुरंग. अशा या खाकी वर्दीतील पांडुरंगाला नतमस्तक होऊन मनोभावे प्रणाम !
सदरक्षणाय..खलनिग्रहणाय या ब्रिद वाक्यानुसार उन्हा-तान्हाची पर्वा न करता आज पोलीस दलांतील कर्मचारी नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहेत. गणेशोत्सवातील बंदोबस्त असो की मराठा आरक्षणासाठी लाखोंचा मुंबईत आलेला जमाव असो. या सर्व परिस्थितीत भर पावसात रात्रं दिवस रस्त्यावर उभा राहत शांततेने ड्युटी बजाविणारा पांडू नाही तर पांडुरंग आहे. अशा खाकी वर्दीतील या पांडुरंगाला नतमस्तक होऊन प्रणाम. वास्तविक कल्पनेच्या बाहेर राहून आभासी जगातील चित्रपटात याच पांडुरंगाला पांडूची उपमा दिल्याने आजतागायत तो उपेक्षित राहीला आहे. मात्र ज्यावेळेस नागरिकांच्या सुरक्षेसाठी हाच पांडू स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उभा राहतो, त्यावेळेस मानवतेच्या ऊपातील या खाकी वर्दीतील पांडुरंगाचे दर्शन होते. अशावेळी या पांडुरंगाने जीवाची पर्वा न करता, कसाब सारख्या दहशतवाद्याच्या गोळ्या देखील स्वत:च्या अंगावर झेलत जीवाची आहुती दिली. मात्र निष्पाप नागरिकांचे होणारे शिरकाण त्याने थांबविले. आझाद मैदान हिंसाचारा दरम्यान हिंसक जमावाचा निरपराध नागरिकांना याचा फटका बसू नये, याकरीता स्वत: रस्त्यावर उतरलेल्या खाकी वर्दीतील पांडुरंगाने आपली चामडी सोलून घेतली. पण याची झळ निष्पाप नागरिकांना बसू दिली नाही. एवढेच नाही तर स्वत:च्या अब्रुचे धिंडवडे काढले तरी निष्पापांच्या पदराला कोणाला हात घालू दिला नाही.
अशा प्रकारे अशी अनेक उदाहरणे आहेत, की जी पोलीस दलाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वत:च्या जीवावार उदार होऊन, झेलली आहेत. मात्र याचे काही एक सोयरसुतक नसलेल्या उन्मादांनी अक्षरश: उच्छाद मांडत बंदोबस्त अथवा नाकाबंदीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यालाच लक्ष करण्यास सुऊवात केली आहे. परिस्थितीचा माज आणि पैशांचा खुळखुळाट याच्या जोरावर हे नराधम माजल्यासारखे करायला लागले आहेत. या नराधमांचा माज वेळीच उतरविणे आवश्यक आहे. अन्यथा हा खाकी वर्दीतील पांडुरंग कलियुगातील राक्षसांच्या हल्यांना बळी पडल्याशिवाय राहणार नाही. अशा कितीतरी घटना आहेत की पोलीस दलावर हल्ले झाले आहेत. काल परवाची घटना आहे. अॅण्टॉप हिल पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले समाधान माने या पोलीस कर्मचाऱ्याला माहिती मिळाली की तडीपार आरोपी पुन्हा एकदा परिसरात आला आहे. याची खातरजमा करण्यास गेलेल्या या पोलीस कर्मचाऱ्यावर तडीपार गुन्हेगाराने चाकुने हल्ला केला. वेळीच प्रसंगावधान राखत माने यांनी हा हल्ला चुकविला मात्र त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. संपूर्ण जगात दबदबा असलेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यावर अशा लुंग्या-फुंग्याची हल्ला करण्याची हिम्मतच कशी होते. यावेळी तत्काळ मदतीला पोहचलेल्या पोलिसांनी या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या. अशा प्रकारचे हल्ले मुंबई पोलीस दलावर होणे हे काही नवीन नाही. मात्र अशा हल्यात देखील ते संयम बाळगत कायद्याचे रक्षण करीत आहेत. पोलीस दलातील संयम म्हणजे काय याचे ज्वलंत उदाहरण द्यायचे झाले तर पोलीस हवालदार एकनाथ पार्टे यांचे देता येईल. 24 ऑक्टोबर 2020 साली ते काळबादेवी येथे नाकाबंदीत वाहतुकीचे नियमन करीत होते. अशावेळी दुचाकीवर आलेल्यांनी हेल्मेट न घातल्याने ते त्यांची विचारपूस करीत होते. अशातच दुचाकीवर असलेल्या महिलेने पार्टे यांच्याशी वाद घालत त्यांना मारहाण करायला सुऊवात केली. यावेळी त्यांची कॉलर पकडत त्यांना मारहाण सुऊ केली. याचे सर्व मोबाईल व्हिडीओ शुटींग येथील नागरिकांनी केले. मात्र तत्काळ मदतीला आलेल्या पोलिसांनी या दोघांना अटक केली. यादरम्यान पार्टे यांनी एकदाही त्यांचा तोल ढळू न देता या महिलेला किंवा तिच्याबरोबर असलेल्या तिच्या मित्राला एक अपशब्द वापरला नाही. त्याचा परिपाक असा झाला की या दोघांवर पोलिसांनी कडक कारवाई केली. तर पार्टे यांच्या संयमाचे सर्व स्तरातून कौतुक झाले. याचा अर्थ असा नाही की सातत्याने पोलिसांच्या संयमाची परीक्षा घ्यावी.
कारण अशा संयमाच्या परीक्षेत विलास शिंदे या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची ऊखरुख अद्यापही पोलिस दलाला जाणवत आहे. 23
ऑगस्ट 2016 साली विलास शिंदे हे खार परिसरातील एस. व्ही. रोडवर वाहनांची तपासणी करीत होते. अशातच एका दुचाकीस्वाराने ना हेल्मेट घातले होते ना त्याच्याकडे दुचाकीची कागदपत्रे होती. यावेळी शिंदे आणि या दुचाकीस्वारामध्ये शाब्दीक चकमक उडाली. त्यातच दुचाकीस्वाराने त्याच्या मित्राला बोलविले. यावेळी कर्तव्यावर असलेल्या शिंदे यांना लाकडी बांबुने बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत शिंदे हे जबर जखमी झाले. त्यांना ऊग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारावेळी त्यांची प्राणज्योत मालवली. प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अशा मृत्यूने अवघे पोलीस दल हळहळले.
आपले कर्तव्य पार पाडत असताना अनेकदा पैशांचा माज असलेल्यांनी पोलीस दलाला निशाना बनविले आहे. पोलीस दलाने मोठ्या जोमाने काम करायला सुऊवात केली तर राजकीय आडकाठीचा अवलंब होत आहे. यामुळे पोलीस दलाने काम करावे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे नाकाबंदीत बेफाम गाडी चालवून तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुकी कऊन देखील अशा नराधमांना एक फोन आला की निर्दोष सोडावे लागत आहे. यामुळे या नराधमाची आणखी मिजास वाढत आहे, तर पोलीस दलाचे खच्चीकरण होत आहे. अशा प्रकारच्या हल्यानंतर देखील पोलीस दल पुन्हा उत्साहाने आणि कर्तव्यनिष्ठेने आपले काम प्रमाणिकपणे करीत आहे.
सध्या परिस्थिती बदलत चालली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते असल्याने, पोलीस दलाची आधुनिकतेकडे वाटचाल सुऊ आहे. यामुळे पोलीस दलात आत्मविश्वास भरला आहे. पोलीस दलासाठी घरे, बीडीडी चाळींचा पुनर्विकास यामुळे पोलीस दल खुश आहे. आपल्यानंतर कुटुंबियांकडे लक्ष देण्यासाठी राज्य सरकार तत्पर असल्याची भावना त्यांच्यात आहे. आपले घरदार सोडून केवळ नागरिकांच्या सुरक्षेसाठी खाकी वर्दीतील हा पांडुरंग आजही रस्त्यावर उभा आहे.
अमोल राऊत








