कॅमेऱ्यात कैद : नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास, अफवांवर विश्वास नको
बेळगाव : नागेनहट्टी-यरमाळ परिसरात आढळून आलेल्या वन्यप्राण्यांच्या पायाचे ठसे बिबट्याचे नसून ते रानमांजराचे असल्याचे वनखात्याने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये शिवाय कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही वनखात्याने केले. मंगळवारी सायंकाळी गवत आणण्यासाठी गेलेल्या काही शेतकऱ्यांना नागेनहट्टी-यरमाळ शिवारात वन्यप्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आले होते. दरम्यान वनखात्याच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली होती. शिवाय ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र वनखात्याला बिबट्यासदृश प्राण्याबाबत कोणतेच पुरावे मिळाले नाहीत. शिवाय परिसरात आढळून आलेल्या वन्यप्राण्यांचे ठसे हे रानमांजराचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय या रानमांजराचे छायाचित्र वनखात्याच्या हाती लागले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये. शिवाय वन्यप्राण्याविषयी काही पुरावा हाती लागल्यास तात्काळ वनखात्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंगळवारपासून वनखात्याने शोधमोहीम हाती घेतली होती. मात्र बिबट्यासदृश प्राण्यासंबंधी कोणत्याच पाऊलखुणा मिळाल्या नाहीत. शिवाय विष्टा किंवा इतर कोणताच पुरावा हाती लागला नाही. परिसरात वन्यप्राण्यासंबंधी आढळून आलेले पायांचे ठसे रानमांजराचे असल्याचे पाहणीत स्पष्ट झाले आहे. कोंडुसकोप परिसरात गुरुवारी बिबट्या आल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यामुळे गोंधळ उडाला. याची शहानिशा केली असता हा व्हिडिओ फेक असल्याचे समोर आले आहे. दरम्यान हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती एसीएफ नागराज हळेबैलूर यांनी दिली आहे.
फेक व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर होणार कारवाई
नागेनहट्टी-यरमाळ परिसरात आढळून आलेल्या वन्यप्राण्यांच्या पायाचे ठसे हे रानमांजराचे आहेत. बिबट्यासदृश प्राण्याविषयी कोणताच पुरावा हाती लागला नाही. वनखात्याच्या कॅमेऱ्यात रानमांजर कैद झाले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. फेक व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.
– पुरुषोत्तम रावजी (आरएफओ बेळगाव)









