मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे प्रतिपादन : पोषण मास-विविध योजनांचे उद्घाटन
बेळगाव : महिला आणि बाल कल्याण खाते कमीपणाचे मानले जात होते. मात्र, आता गृहलक्ष्मी योजना लागू केल्यानंतर महिलांना या योजनेतून साहाय्य धन दिल्यामुळे या योजनेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे, असे महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. पोषण मास आणि विविध योजनांच्या उद्घाटनप्रसंगी मंगळवारी त्या बोलत होत्या. महिला आणि बाल कल्याण खात्याची जबाबदारी माझ्याकडे सोपविली हे माझे भाग्य आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यामुळेच मला हे मंत्रिपद मिळाले, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या गौरवधनात वाढ करण्याच्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली जाईल, याची ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमात गर्भवती महिलांचा डोहाळे कार्यक्रमही पार पडला. मुलांचे दत्तक स्वीकार- साहाय्यवाणी मदत केंद्र, उद्योगी महिला वसतिगृह केंद्राचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमामध्ये तृतीयपंथीयांच्या हस्ते मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे स्वागत करण्यात आले. प्रारंभी महिला व बाल कल्याण खात्याचे उपसंचालक नागराज आर. यांनी प्रास्ताविक व सुनीता देसाई यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.









