अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा देही असून विदेही असलेला अनन्य भक्त शरीराने अस्तित्वात असतो पण तो मनाने केव्हाच माझ्यात विरघळून गेलेला असतो. त्याचा आणि माझा देह एकच झालेला असतो. तो सगळीकडे स्वस्वरूपाला पहात असल्याने तो जरी समोरचा दृश्य संसार पहात आहे असे वाटत असले तरी प्रत्यक्षात सर्वत्र विश्वव्यापी ईश्वरालाच पहात असतो. त्याच्या लेखी समोर दिसणाऱ्या संसाराचे अस्तित्व असतेच कुठे? त्याच्या दृष्टीने तो केवळ भासच असतो. त्यामुळे तो भासमान दृश्याला काय किंमत देणार? तो स्वत:ला कर्ता समजत नसल्याने त्याच्या देहाच्या हालचाली होताना तर दिसतात पण त्याच्या दृष्टीने त्या कोणाच्या तरी प्रेरणेने होत असतात. त्याला कोणतीही गोष्ट बघण्यासाठी, ऐकण्यासाठी, स्पर्श करून पाहण्यासाठी, चाखून पाहण्यासाठी किंवा वास घेण्यासाठी ज्ञानेंद्रियांची गरज नसते. मी डोळ्यांनी पाहतोय, कानांनी ऐकतोय, सुवास किंवा दुर्वास मला नाकाने जाणवतोय किंवा मृदू, कठीण असे स्पर्श मला त्वचेने जाणवतायत असे त्याला कधी वाटत नाही.
भगवंत उद्धवाला जे सांगत होते त्याचे प्रत्यंतर पहायचे झाले तर सूरदास किंवा गुलाबराव महाराज ह्यांचे चरित्र अभ्यासावे लागेल. ते दोघेही अंध होते परंतु व्यवहारात वावरताना, भक्तीपर रचना करताना त्यांना त्यांच्या आंधळेपणाची कधी अडचण वाटली नाही कारण त्यांना प्राप्त असलेल्या ज्ञानचक्षुंनी ज्ञानेंद्रियांचे सर्व व्यवहार ते करू शकत होते. भगवंत अनन्य भक्ताबद्दल सांगताना पुढे म्हणाले, तो पायांनी चालताना दिसतो, इच्छेनुसार पृथ्वीवर फिरतो पण ह्या सगळ्या हालचाली तो स्वत:हून करत नाही. हाताने दान देताना दिसतो पण मी दान करतोय असा भाव काही त्याच्या चेहऱ्यावर असत नाही. कायिक वाचिक मानसिक असे कोणतेही स्वाभाविक म्हणजे देहाची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले कर्म करताना तो दिसतो पण आपण ते करतोय ह्याचे भानच त्याला नसते. सामान्य माणूस आपल्या सर्व गोष्टी देवाच्या इच्छेनुसार चालतात असं म्हणत असतो परंतु तो स्वत: कोणतीही हालचाल करू लागला की, आपणही हालचाल अमुक अमुक कारणासाठी करतोय, ती केली की अमुक अमुक गोष्ट आपल्याला प्राप्त होईल अशा विचारातून करत असतो.
म्हणजेच तो जरी म्हणत असला की मी कर्ता नाही तरी तो त्याच्या नकळत का होईना तो स्वत:च्या मनाने स्वत:च्या बुद्धीच्या सल्ल्यानुसार, स्वत:ला कर्ता समजून ठरवलेल्या हालचाली करत असतो परंतु माझ्याशी अनन्यता साधलेल्या भक्ताने, योग्याने त्याचे मन आणि बुद्धी मला अर्पण करून तो संपूर्णपणे माझ्यात विलीन झालेला असतो. त्यामुळे त्याला स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व असे उरलेलेच नसते. त्यामुळे तो स्वत: अकर्ता असल्याचे प्रत्यक्ष अनुभवत असतो. घेत असलेल्या अनुभवानुसार तो लोकांना माणूस कर्ता नसून देव कर्ता आहे असे सांगत असतो. त्याची उक्ती आणि कृती ह्यांचा बरोबर मेळ बसत असतो. श्रीतुकाराम महाराजांनी हे पुरेपूर ओळखले होते. त्यामुळे अशा व्यक्तीचे दास्यत्व करायला ते तयार होते कारण त्याचे देवतास्वरूप ते जाणून होते. ते म्हणतात, बोले तैसा चाले । त्याची वंदीन पाउलें ।। स्वये झाडीन अंगण । त्याचे दासत्व करीन ।। त्याचा होईन किंकर उभा ठाकेन जोडोनिकर ।। तुका म्हणे देव । त्याचे चरणीं माझा भाव ।। बुवा म्हणतात तो देव आहे असा त्याच्या चरणी माझा भाव आहे. भगवंत पुढे म्हणाले, उद्धवा असा ज्ञाता मनुष्य सदैव निजात्मसुखात नहात असतो. देहात असून त्याला देहाची जाणीव नसते मग तो देहाच्या कर्मात कशाला अडकेल? तो तर परमात्मसुखाने संतुष्ट झालेला असतो. सामान्य माणसाला कर्माचं बंधन असतं पण सर्व कर्मे करूनसुद्धा सज्ञानाला कर्मबंधन बाधू शकत नाही कारण तो संपूर्ण निरपेक्ष असल्याने तो करत असलेल्या कोणत्याही कर्मातून मला अमुक एक मिळवायचं आहे असा विचार त्याच्या मनात कधीही येत नाही.
क्रमश:








