मुलीच्या आजारपणात आईने संपविली बचत
अचानक बदलले नशीब अन् झाली कोटय़धीश
फ्लोरिडाच्या लेकलँडची एक महिला अचानकपणे कोटय़धीश झाली आहे. या महिलेने 2 दशलक्ष डॉलर्सच्या (16 कोटी 40 लाख) लॉटरीचे बक्षीस जिंकले आहे. या महिलेचे नाव गेराल्डिन गिम्बलेट असून त्यांनी स्वतःच्या आयुष्यभराची बचत मुलीच्या कर्करोगावरील उपचारासाठी खर्च केली होती. गिम्बलेट यांची मुलगी ब्रेस्ट कॅन्सरने ग्रस्त होती, परंतु आता गिम्बलेट यांना दुहेरी आनंद व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे. आता त्यांच्या मुलीचा उपचार पूर्ण होण्यासह कोटय़वधींची लॉटरी त्यांनी जिंकली आहे.
गिम्बलेट यांनी मुलीच्या कर्करोगावरील उपचाराच्या अंतिम टप्प्यात लेकलँडच्या एका गॅस स्टेशनवर 2 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस असलेले लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. विशेष म्हणजे गॅस स्टेशनवरील क्लार्कने गिम्बलेट यांना लॉटरीचे कुठलेच तिकीट शिल्लक नसल्याचे प्रथम सांगितले होते. गिम्बलेट यांनी आग्रह केल्याने क्लार्कने शोधून एक तिकीट त्यांना विकले होते.

आपण लॉटरी जिंकल्याचे कळताच गिम्बलेट यांना मोठा आनंद झाला. गिम्बलेट यांनी तल्हासी येथील फ्लोरिडा लॉटरी मुख्यालयात पूर्ण कुटुंबासोबत धाव घेतली होती. माझ्या आईने मी आजारी झाल्यावर उपचारासाठी स्वतःची पूर्ण बचत संपविली होती. ज्या दिवशी माझ्या आईने हे लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते, त्यादिवशीच मी उपचार पूर्ण करून रुग्णालयातून बाहेर पडले होते असे गिम्बलेट यांच्या मुलीने सांगितले.
सोशल मीडियावर आता गिम्बलेट यांची ही कहाणी व्हायरल होत आहे. सोशल मीडिया युजर्स अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. स्वतःच्या मुलांना वाचविण्यासाठी स्वतः दिवाळखोर होत असलेल्या सर्व आईवडिलांना देवाने मदत करावी अशी प्रतिक्रिया एका युजरने व्यक्त केली आहे.









