युक्रेनची अपरिमित हानी, पण निर्धार ठाम, युद्ध थांबविण्यास रशियाचा नकार, जगाचे शस्त्रसंधीचे आवाहन
@ कीव्ह, मॉस्को / वृत्तसंस्था
जगाच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम करणाऱया आणि जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा साखळय़ा तुटल्यामुळे जगासमोर महागाईचे संकट निर्माण करणाऱया रशिया-युक्रेन युद्धाला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले आहे. मागच्या वर्षी 24 फेब्रुवारीलाच रशियाने युक्रेनवर आक्रमण केले होते. या वर्षभराच्या काळात रशियाने सातत्याने युक्रेनवर हल्ले केलेले असून त्या देशाची अपरिमित हानी केली आहे. तथापि, रशियाच्या अपेक्षेप्रमाणे युक्रेनचा पाडाव झालेला नाही. तसेच रशियाच्या सामरिक आणि आर्थिक क्षमतेचीही काही प्रमाणात हानी झालेली आहे.
या एक वर्षाच्या कालावधीत या युद्धात 8,006 नागरिक मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये बहुसंख्य नागरिक युक्रेनचेच आहेत. मृत नागरिकांमध्ये महिला आणि बालकांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार आकडेवारीनुसार 13,287 जण जखमी झाले आहेत. लक्षावधी लोकांनी युक्रेन आणि रशियातून पलायन करुन अन्य देशांमध्ये आश्रय घेतला आहे. आतापर्यंत तरी या युद्धाने विनाश आणि स्थलांतर याखेरीज काहीही दिलेले नाही, अशी प्रतिक्रिया तज्ञांसह सर्वसामान्यांचीही आहे. युक्रेनला अमेरिका आणि इतर युरोपियन देशांनी शस्त्रास्त्रे आणि पैसा यांचे साहाय्य मोठय़ा प्रमाणावर केले आहे. या सामग्रीच्या आणि पाठींब्याच्या जोरावर युक्रेनने युद्धात टिकाव धरला आहे. रशियाचीही हानी मोठय़ा प्रमाणात झाल्याचे पाश्चिमात्य वृत्तमाध्यमांचे म्हणणे आहे.
प्रचंड प्रमाणात खर्च
या युद्धात युक्रेन, रशिया, युरोप आणि अमेरिका यांनी आतापर्यंत किती खर्च केला, याची निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी, किमान 20 अब्ज डॉलर्स पाण्यात गेले असावेत, असे अनुमान आहे. शेकडो कोटी डॉलर्सची स्फोटके आणि शस्त्रास्त्रे उपयोगात आणण्यात आली आहेत. अनेक नव्या शस्त्रांचे प्रयोग करण्यात आले असून त्यांच्या मारक शक्तीचे परीक्षणही करण्यात आले आहे.
अर्थव्यवस्थेवर परिणाम
युक्रेन हा देश गहू आणि तेलबियांचा मोठा उत्पादक देश आहे. युरोप, आफ्रिकेतील देश, तसेच भारतही या देशाकडून विविध प्रकारची खाद्यतेले आणि इतर जीवनावश्यक वस्तू विकत घेतो. युद्धामुळे हा पुरवठा थांबल्यामुळे भारतात खाद्यतेलाची टंचाई निर्माण झाल्याने दरात वाढ झाली. तर युरोप आणि काही प्रमाणात अमेरिकेतही गव्हाची टंचाई निर्माण झाली. गव्हाच्या टंचाईचा फटका मुख्यतः उत्तर आफ्रिकेतील देशांना बसल्याचे दिसून आले आहे.
भारताचे विद्यार्थी अधांतरी
गहू आणि खाद्यतेलाप्रमाणे युक्रेन शिक्षणाचे केंद्रही आहे. 5 हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थी तेथे वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले होते. त्या सर्वांना परत आणण्यासाठी भारताला विशेष प्रयत्न करावे लागले. 2 भारतीय विद्यार्थ्यांचा बळी या युद्धात गेला असला तरी, बहुतेक विद्यार्थ्यांना सुखरुप परत आणण्यात यश आले होते. तथापि, या विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहिल्याने त्यांना मोठय़ा समस्येला तोड द्यावे लागत आहे. याशिवाय अन्य अभ्यासक्रमांसाठीही तेथे मोठय़ा प्रमाणात भारतीय विद्यार्थी होते, त्यांनाही हीच समस्या भेडसावत आहे.
भारताला लाभही
भारताचा अन्य एका संदर्भात या युद्धामुळे लाभ झाला आहे. रशियाला युद्ध सुरू ठेवण्यासाठी पैशाची आवश्यकता असल्याने तो देश कच्चे इंधन तेल आपल्या मित्र देशांना बाजारभावापेक्षा कमी दरात देत आहे. भारताने मोठय़ा प्रमाणावर असे तेल रशियाकडून खरेदी केल्याने भारतात पेट्रोल आणि डिझेलचे भाव बऱयापैकी नियंत्रणात राहू शकलेले आहेत. अनेक युरोपियन देशही रशियाकडून या स्वस्त तेलाचा लाभ भारताच्या माध्यमातून घेत आहेत. याचा अर्थ असा की, भारत रशियाकडून या देशांसाठी तेल खरेदी करतो आणि नंतर या देशांना विकतो.
आर्थिक निर्बंधांचा प्रभाव मर्यादित
रशियाने 24 फेब्रुवारी 2022 या दिवशी युक्रेनवर अचानक आक्रमण केल्याने या युद्धाचा प्रारंभ झाला. त्यानंतर रशियावर युरोप आणि अमेरिकेने आर्थिक निर्बंध लादले. तथापि, रशियाच्या ऊर्जास्रोतांची युरोपातील कित्येक देशांना आवश्यकता असल्याने त्यांनी बंदी असूनही ऊर्जा रशियाकडून खरेदी करणे सुरुच ठेवले आहे. परिणामी आर्थिक निर्बंधांचा फारसा परिणाम दिसून आलेला नाही.
वर्षभरात युद्ध आघाडीवर काय घडले ?
ड 24 फेब्रुवारी 2022 ः रशियाचे युक्रेनवर उत्तर, दक्षिण आणि पूर्वेकडून अचानक आक्रमण. रशियन सैनिक युक्रेनमध्ये घुसले. युक्रेनची दोन महत्त्वाची शहरे कीव्ह आणि खार्काव्ह यांच्यावर रशियाचा क्षेपणास्त्रांचा वर्षाव, विमानहल्ले.
ड मार्च ः खेरसन भाग रशियाच्या ताब्यात. क्रिमिया भागाशी रशियाला जोडणारा पूल या भागात निर्माण करण्याची रशियाची योजना. कीव्ह आणि खार्काव्ह शहरांवर रशियाचे सातत्याने हल्ले, क्षेपणास्त्रांचा, बाँबचा वर्षाव.
ड एप्रिल ः कीव्हमधून रशियाची माघार, युक्रेनचा तिखट प्रतिकार. कीव्हमध्ये मोठय़ा प्रमाणात निरपराध नागरिकांच्या हत्या करण्यात आल्याचे उघड. दोन्ही देशांनी हत्यांचे उत्तरदायित्व एकमेकांवर ढकलले. रशियावर जोरदार टीका.
ड मे ः रशियाचा मारिओपोलवर प्रदींर्घ हल्ल्यांच्यानंतर ताबा, अझोव्हस्टॉल पोलाद प्रकल्पाचा नाश, युक्रेनचा काळय़ा समुद्राचा तटीय प्रदेश रशियाच्या ताब्यात. महत्त्वाचे बंदर रशियाकडे. युपेनचा व्यापार आणि आयातनिर्यात थंडावली.
ड जून ः स्नेक बेटे युक्रेनने परत मिळविली. यामुळे युक्रेनचा आत्मविश्वास दुणावला. पुढच्या काळात युक्रेनने रशियाला अधिक मोठा प्रतिकार सुरू केला होता.
ड जुलै ः अमेरिकेने पुरविलेली एचआयएमएआरएस यंत्रणा युक्रेनकडून स्थापित. पण लुहान्स्क भागावर रशियाचे पूर्ण नियंत्रण, डोनाबास येथील युद्धाचा वेग मंदावला. झारोरिझीया अणुप्रकल्पाचा धोका वाढल्याने जगभरात चिंता.
ड ऑगस्ट ः युक्रेनचा रशियाच्या सैन्याविरोधात प्रतिहल्ला. खेरसन येथे पाश्चिमात्य देशांनी पुरविलेल्या शस्त्रांच्या साहाय्याने युक्रेनचा प्रतिकार. क्रिमिया येथील रशियाच्या तळावर युक्रेनचा हल्ला. आयएईए निरीक्षकांना अनुमती.
ड सप्टेंबर ः युक्रेनचा प्रतिकार वाढला. खार्किव्ह परत मिळविले. रशियाच्या सैनिकांचे नीतीधैर्य खचल्याची वृत्ते. नॉर्ड समुद्रातील पाईपलाईन कारस्थानाने फोडली. रशियामध्ये सैनिकसेवेची सक्ती. तिच्या विरोधात नागरिकांचे देशातून पलायन.

ड ऑक्टोबर ः रशिया आणि क्रिमिया यांना जोडणाऱया सेतूवर बॉम्बस्फोट. रशियाकडून युक्रेनच्या ऊर्जा सुविधा तोडण्याचा प्रयत्न. लुहान्स्क, डोनेस्क, खेरसन आणि झापोरझिया या प्रदेशांवर रशियाने मिळविला ताबा, युक्रेनचा प्रतिकार.
ड नोव्हेंबर ः रशियाच्या सेना खेरसनमधून माघारी. खेरसनवर पुन्हा युक्रेनचा ताबा. कोणत्याही बाजूचे वर्चस्व प्रस्थापित न होता युद्ध पुढे सुरू. युपेनचा प्रथमच रशियाच्या आतील भागात ड्रोन हल्ला. रशियात युद्धविरोधी वातावरण.
ड डिसेंबर ः युद्ध सुरुच. ते थांबविण्यासाठी भारताने प्रयत्न करण्याचे विश्व समुदायाचे आवाहन. भारताचेही त्या दिशेने काही प्रमाणात प्रयत्न. तथापि, दोन्ही बाजूंकडून तडजोडीस नकार असल्याने विश्वसमुदायाचे प्रयत्न असफल.
ड. जानेवारी ः युद्ध सातत्याने सुरुच. पण रशियाच्या हल्ल्यांचे प्रमाण कमी. युपेनचा प्रतिकारही सौम्य. पुन्हा शस्त्रसंधीची चर्चा दोन्ही देशांमध्ये घडविण्याचे प्रयत्न. रशिया आणि युक्रेन कडून चर्चांच्या केलेल्या आवाहनाना थंडा प्रतिसाद
ड फेब्रुवारी ः अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांची युपेनला अचानक भेट. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचे महत्त्वाचे भाषण, युद्धाचे उत्तरदायित्व पाश्चात्य देशांवर. बायडेन यांचे प्रत्युत्तर, रशियाला शस्त्रपुरवठा केल्याचा चीनवर आरोप.









