वृत्तसंस्था / पाटणा
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील बिहार सरकारमधील एक मंत्री आणि हिंदुस्थानी आवाम मोर्चा या पक्षाचे नेते जीतनराम मांझी यांचे पुत्र संतोष सुमन यांनी मंत्रिपदाचा त्याग केला आहे. त्यांनी कुमार यांच्याकडे आपले त्यागपत्र मंगळवारी पाठवून दिले. 23 जूनला नितीश कुमार यांनी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक पाटणा येथे आयोजित केली आहे. त्यापूर्वी त्यांच्याच एका मित्रपक्षाच्या मंत्र्याने राजीनामा दिल्याने विरोधी ऐक्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह पडले.
संतोष सुमन यांच्याकडे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण या विभागाचे उत्तरदायित्व होते. त्यागपत्र देण्यापूर्वी त्यांनी संयुक्त जनता दलाचे नेते आणि बिहारचे अर्थमंत्री विजय कुमार चौधरी यांच्याशी चर्चा केली होती. चर्चेनंतर त्यांनी मंत्रिपदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती देण्यात आली.
दबावामुळे पदत्याग
आपल्या हिंदुस्थानी आवाम मोर्चा या पक्षावर संयुक्त जनता दलात विलीन होण्यासाठी सातत्याने नितीश कुमार यांच्याकडून दबाव टाकण्यात येत होता. या दबावाला झुगारुन देण्यासाठी मी मंत्रिपद सोडणे श्रेयस्कर मानले. आम्हाला सत्तेचा मोह नाही. आम्ही आमचा पक्ष संयुक्त जनता दलात विलीन करणार नाही, असे प्रतिपादन सुमन यांनी त्यागपत्र दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिले.
विधानसभेत चार आमदार
हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे बिहार विधानसभेत चार आमदार आहेत. तसेच बिहार विधान परिषदेत या पक्षाचा 1 आमदार आहे. गेल्या वर्षी नितीश कुमार यांनी भाजपशी काडीमोड घेऊन लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी संधान बांधले होते. त्यावेळी मांझी यांच्या पक्षानेही कुमार यांच्यासह राजदशी युती केली होती आणि सरकारमध्ये सहभाग घेतला होता. संजद, राजद आणि काँग्रेस यांच्या महागठबंधनला मांझी यांच्या पक्षाने विनाशर्त पाठिंबा दिला होता.
परिणाम होणार नाही
सुमन यांच्या त्यागपत्राचा बिहार सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच त्यांना त्यांचा मार्ग मोकळा आहे. त्यांच्या जाण्याने राज्य सरकारच्या स्थैर्याला कोणतीही बाधा पोहचणार नाही, अशी प्रतिक्रिया आणखी एक मंत्री लेसी सिंग यांनी व्यक्त केली. नितीश कुमार हेच महागठबंधनचे नेते असल्याचा त्यांनी पुनरुचार केला. तथापि, या त्यागपत्रामुळे बिहारचे राजकारण ढवळून निघाले आहे.
पुढे काय करणार
बिहार सरकारमधून बाहेर पडल्यानंतर मांझी यांचा पक्ष कोणता मार्ग स्वीकारणार याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. जीतनराम मांझी यांच्या पक्षाचा भाजपकडे ओढा असल्याची चर्चा आहे. अद्याप, मांझी यांनी या शक्यतेला दुजोरा दिलेला नाही. पण भाजपशी त्यांची गुप्त चर्चा सुरु असून भाजपने त्यांच्यासमोर अधिक मोठा प्रस्ताव ठेवल्याचेही बोलले जाते. यामुळे काही दिवसात यासंबंधातील चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती देण्यात आली.









